भीमाशंकर : बोरघर-कावळखिंड रस्ता खचला | पुढारी

भीमाशंकर : बोरघर-कावळखिंड रस्ता खचला

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाने थैमान घातल्याने बोरघर-कावळखिंड हा रस्ता बुधवारी दुपारी खचला आहे. यामुळे बोरघरच्या आठ वाड्या व जुन्नरमधील तीन गावे आणि दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. आंबेगाव व जुन्नर तालुक्यांना जोडणारा हा मध्यवर्ती रस्ता आहे. बोरघर व आहुपे परिसरात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे बोरघर-कावळखिंड हा रस्ता खचला आहे.

यामुळे बोरघरच्या माळवाडी, उंभरवाडी, काळवाडी, घोडेवाडी, आवळेवाडी, घोटमाळ, जायवाडी, कावळखिंड या वाड्या, तसेच जुन्नर तालुक्यातील वरसावणे, सुकाळवेढे, हिवरे पठार या गावांसह पिंपरवाडी व ढेंगळेवाडीचा आंबेगाव तालुक्याशी संपर्क तुटला आहे. हा रस्ता दळणवळणासाठी एकमेव मार्ग आहे.

सुदैवाने रस्ता खचला त्या वेळी त्या ठिकाणी वाहने नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, घाटात हा रस्ता तुटला असल्याने सध्या वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी बाजार समिती उपसभापती संजय शेळके यांच्यासह या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button