पुणे जिल्ह्यातील 88 हजार दुबार मतदार वगळले | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 88 हजार दुबार मतदार वगळले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: निवडणूक आयोगाने मतदार यादीतून दुबार नावे वगळली आहेत. जिल्ह्यात सर्व 21 विधानसभा मतदार संघांत 4 लाख 6 हजार 589 छायाचित्र नसलेले मतदार आहेत. त्यापैकी 3 लाख 94 हजार 725 छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यातील दुबार नोंदी असलेले मतदार 88 हजार 424 कमी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघांमध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र गोळा करून त्यांचे छायाचित्र अद्ययावत करणे किंवा मयत झालेल्या, दुबार असलेल्या व स्थंलातरित झालेल्या मतदारांची वगळणी करण्याचे कामकाज, तसेच दुबार नोंदी असलेल्या मतदारांची पडताळणी करून कमी केले जात आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या क्र. 6, 7, 8 आणि 8 अ नमुन्यातील एकूण 13 लाख 6 हजार 71 अर्जावर अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. या वर्षी 10 ऑगस्टपर्यंत 8 लाख 14 हजार 342 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 7 लाख 28 हजार 128 अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार, मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता व प्रमाणीकरणासाठी मतदारांची ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मतदार यादीतील मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या https://nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ अ‍ॅप आपल्या मोबाईल डाऊनलोड करुन भरता येईल.

छायाचित्र मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात छायाचित्र न जमा केलेल्या मतदारांनी त्यांचे छायाचित्र तत्काळ जमा करावीत. तसेच, मतदार यादीत दुबार नावे असणार्‍या किंवा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मयत झालेली असलेल्या मतदारांनी फॉर्म क्र.7 भारत निवडणूक आयोगाच्या  https://nvsp.in या संकेतस्थळावरुन किंवा ‘वोटर हेल्पलाईन’या मोबाईल अ‍ॅपद्वारे भरावे,

                                            – डॉ. राजेश देशमुख, जिल्हा निवडणूक अधिकारी.

Back to top button