दमदार पावसाने भातरोपे तरारली | पुढारी

दमदार पावसाने भातरोपे तरारली

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी भात लावणीचे काम सुरू केले होेते. काही ठिकाणी लावणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते; मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातरोपे तरारली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. मावळ तालुका हा भाताचे पिक घेणारा प्रमुख तालुका आहे. या वषी तालुक्यात एकुण 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भात पीक पिकविण्याचे उदिष्ट राज्य शासनाच्या मावळ तालुका कृषी विभागाने ठेवलेले आहे.

जून महिन्यापासून भात रोपांच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्यात  नियमित पाऊस सुरू झाल्यावर भात लावगडी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त होता. गेले दोन महिने मावळात भात लावगडी हा एक कलमी कार्यक्रम शेतकरी आपआपल्या शेतावर राबवित आहेत. एकाच वेळी संपुर्ण तालुक्यातील भात लावगडीची कामे आल्याने लावगडीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची अडचण झाली. काही शेतकर्‍यांनी दुसर्‍या गावावरुन मजूर आणून भातपिकाच्या लागवडी पूर्ण केल्या आहेत.

अनेक अडचणी येऊनही शेतकरी बांधवांनी आपले भात लावगडीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत तालुक्यातील 90 टक्के क्षेत्रावर भात लावगडी पूर्ण झालेल्या आहेत. मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आणि त्यांच्या सर्व अधिकार्‍यांनी भात उत्पादक शेतकरी बांधवाना प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन केले आहे. मावळ तालुक्यात साधारणत: इंद्रायणी वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Back to top button