सांगवीतील सोयाबीन फुलोर्‍याने बहरले | पुढारी

सांगवीतील सोयाबीन फुलोर्‍याने बहरले

सांगवी; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात खरीप पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सोयाबीन पिकाला शेतकरी प्राधान्य देतात. यंदाच्या पोषक वातावरणामुळे सांगवी परिसरातील सोयाबीन पिके जोमदार वाढून सध्या फुलोर्‍याने बहरली आहेत. जोमदार पिकांमुळे एकरी उत्पादन वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

जागतिक स्तरावर खाद्यतेल बनविण्यासाठी सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडी या पिकांचा समावेश होतो. महाराष्ट्रात सोयाबीन पिकाला पोषक वातावरणामुळे जास्तीचे उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते. त्याच अनुषंगाने सांगवी परिसरात बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीनसारख्या पिकांच्या लागवडीसाठी पसंती दिली आहे. सांगवी परिसरातील एजगर वस्ती येथील वीरसिंग शिवाजी एजगर यांनी एक हेक्टर सोयाबीनची लागवड केली आहे.

त्यांनी उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून जूनच्या पहिल्या आठवड्यात एक हेक्टर क्षेत्रावर सुधारीत वाणाची लागवड केली. एका पाण्यावर व एक औषध फवारणीवर सध्या हे पीक जोरदार आले असून, मोठ्या प्रमाणावर फुलकळी लागली आहे. पिकातून किमान 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळणार असल्याचे एजगर यांनी सांगितले.

दरम्यान,बहुतांश शेतकरी सोयाबीनचे माढे पीक घेतात. तर काही शेतकरी नवीन ऊस लागवडीत आंतरपिक म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेताना दिसतात. आंतरपिकाचे उत्पादन मिळण्यासह भविष्यातील कोणत्याही पिकाला बेवड म्हणून उपयोग होतो. आंतरपिकातून उसाच्या संपूर्ण पिकाचा खर्च निघत असल्याचे सांगितले जाते.

Back to top button