पुणे : ‘सीईटी’साठी 82 टक्के विद्यार्थ्यांचीच उपस्थिती | पुढारी

पुणे : ‘सीईटी’साठी 82 टक्के विद्यार्थ्यांचीच उपस्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या सीईटी सेलतर्फे इंजिनिअरिंग, फार्मसीच्या पदवी प्रवेशांसाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. ‘पीसीएम’ प्रकारात घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग सीईटीसाठी 82 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. फार्मसीसाठीही विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे दिसून आले. इंजिनिअरिंग, फार्मसी या विषयांप्रमाणेच मास्टर ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) प्रवेशांसाठी घेण्यात येणारी सीईटीही शुक्रवारी सुरू झाली. राज्यातील 89 केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी एकूण 12 हजार 866 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 हजार 931 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला हजेरी लावली.

यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेला बसण्याचे प्रमाण 84 टक्के इतके होते. इंजिनिअरिंगची सीईटी 18 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून, विविध टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली असून, या साठी 25 हजार 650 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 21 हजार 236 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी घेण्यात येणार्‍या सीईटीमध्ये तांत्रिक अडथळे आले नसल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. इतर सीईटी टप्प्याटप्प्यांनी सुरू होत असून ऑगस्ट महिन्यात होणार्‍या परीक्षांसंदर्भातील अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटवर संपर्क साधत राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एमसीए सीईटी
नोंदणी केलेले विद्यार्थी : 12,866
परीक्षेला प्रत्यक्ष हजर विद्यार्थी : 10,931
टक्केवारी : 84
परीक्षा केंद्र : 89
इंजिनिअरिंग सीईटी (पीसीएम- पहिला दिवस)
नोंदणी झालेले विद्यार्थी : 25, 650
परीक्षेला प्रत्यक्ष हजर विद्यार्थी : 21,236
टक्केवारी : 82.79 टक्के

Back to top button