पुणे : बेल्हे परिसरात रंगले करमणुकीचे फड | पुढारी

पुणे : बेल्हे परिसरात रंगले करमणुकीचे फड

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : कुठे फुगड्या तर कुठे झिम्मा, कुठे कलगीतुरा सामना तर कुठे वाघ्या-मुरळी स्पर्धांच्या आयोजनाने नागपंचमीनिमित्त रसिकांच्या करमणुकीचे फड मंगळवारी (दि. 2) बेल्हे परिसरात रंगले.

बेल्हे परिसरात राजुरी, आळे, वडगाव कांदळी, वडगाव आनंद आदी गावांत नागपंचमीनिमित्त चिमुरड्यापासून आबालवृद्धापर्यंत करमणुकीसाठी कलगीतुरा सामना, वाघ्या-मुरळीच्या फडाची स्पर्धा भरविण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. नागपंचमीनिमित्त पूर्वी बेल्ह्यात बाजार तळावर लिंबाच्या झाडाला मोठा झोका बांधला जात असे. त्यावर सर्वात उंच झोका कोणाचा जातो, याची महिला-पुरुषांमध्ये स्पर्धा लागायची. सायंकाळी गाव व परिसरातील मल्लांसाठी कुस्त्यांचा आखाडा भरविला जात होता, तो आज होत नसला तरी गावच्या रसिकांना करमणुकीसाठी कलगीतुरा सामना, वाघ्या-मुरळीच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

रंगपंचमीच्या निमित्ताने राजुरी येथे शाहीर श्रीराम घुले पार्टी यांच्या दिवसभर कलगीतुरा रंगलेल्या सामन्यात ग्रामस्थ रसिकांची चागलीच करमणूक झाली. तर गावातील महिलांनी झिम्मा, फुगड्या, भोंडला खेळत नागपंचमीचा आनंद लुटला. माजी सभापती दीपक आवटे, जी. के. औटी, एम. डी. घगाळे, माऊली शेळके, अनंतराव गटकळ आदींनी परिश्रम घेतले.

Back to top button