पालिकेचा ठेकेदाराला दणका, प्रत्येक खड्ड्यापोटी पाच हजार रुपयांचा दंड | पुढारी

पालिकेचा ठेकेदाराला दणका, प्रत्येक खड्ड्यापोटी पाच हजार रुपयांचा दंड

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : ‘फाइव्ह नाइन चौकातून विश्रांतवाडीकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने करून घेतले जाणार आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
विमानतळावरून विश्रांतवाडीकडे येणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यावर पावसाळी वाहिनीचे काम झाल्यानंतर ड्रेनेज विभागाने त्याचे डांबरीकरण केले होते.

मात्र, जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे खडी उखडून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खडी पसरल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत तसेच धुळीचा त्रासही वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील टिंगरे, विनोद पवार, राहुल प्रताप, श्याम ताटे यांसह अनेकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

निकृष्ट डांबरीकरणाबाबत महापालिका प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कुलकर्णी म्हणाले, ‘संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम पुन्हा करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डांबरीकरण पूर्ण केल्यानंतर पडलेल्या प्रत्येक खड्ड्यापोटी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे.”

Back to top button