पुणे : जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीवर हरकतींचा पाऊस | पुढारी

पुणे : जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीवर हरकतींचा पाऊस

पुणे, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये चूक झाल्याचे समोर आले. तर गट आणि गणांच्या आरक्षणावर हरकत घेणार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. जिल्हा परिषद गटांसाठी 91 तर पंचायत समिती गणांवर आक्षेप घेणार्‍या 13 असे एकूण 104 हरकती दाखल झाल्या. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून जिल्हाधिकारी आरक्षण निश्चित करून 5 ऑगस्ट रोजी राजपत्र प्रसिद्ध करणार आहेत.

जिल्हा परिषदेचे 82 गट तर त्यापेक्षा दुप्पट 164 पंचायत समिती गण आहेत. 28 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आले. दरम्यान, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षण चक्राकार पद्धतीने लोकसंख्या निकषावर निश्चित केले जाते. परंतु, गटांच्या आरक्षण प्रक्रियेत चूक झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा नव्याने काढण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर-सांगवी गटाबरोबरच आणखी काही चुका झाल्याच्या तक्रारी येतील, असे मानले जात होते. बारामती तालुक्यातीलच नीरावागज – डोरलेवाडी गटामध्ये पुन्हा एकदा अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षण दुसर्‍यांदा, तर आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली बुद्रूक गटामध्ये अनुसूचित जमाती आरक्षण दुसर्‍यांदा आल्याचा दावा करत हरकत घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणावर तब्बल 104 हरकती दाखल झाल्या आहेत.

दुसर्‍यांदा आरक्षण सोडत काढावा लागण्याची शक्यता

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यापूर्वी असणारे गट आणि त्यामधील आरक्षणाचे राजपत्र तसेच अधिसूचना यांची पडताळणी पुन्हा करण्यात आली आहे. नवी गट, गण रचना करण्याचे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यांच्याकडूनच खातरजमा करून तसेच जुन्या अधिसूचना आणि गॅझेट यांची पडताळणी करून रचना तयार करण्यात आली. तर आरक्षण योग्य असल्याचे पत्र घेण्यात आले होते. तरीदेखील त्यामध्ये चुका दिसून आल्याने पुन्हा एकदा आरक्षण काढण्याचे नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.

दौंड तालुक्यात तब्बल 35 हरकती

जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणावर 104 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यात गटांसाठी सर्वाधिक 30 हरकती दौंड तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ खेड मध्ये 15, बारामती 10, शिरूर 7, आंबेगाव, मावळ आणि हवेली प्रत्येकी 4, इंदापूर 3, जुन्नर तर मुळशी आणि पुरंदर प्रत्येकी एक हरकत दाखल झाली आहे. वेल्हे आणि भोर तालुक्यांतून एकही हरकत नाही. पंचायत समिती गणांच्या आरक्षणाविरोधात मुळशी तालुक्यात सहा, दौंड 5, तर खेड आणि हवेली तालुक्यांतून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली आहे.

Back to top button