पिंपळे गुरव : लहान मुलांमध्ये कार्टून राख्यांची क्रेझ | पुढारी

पिंपळे गुरव : लहान मुलांमध्ये कार्टून राख्यांची क्रेझ

पिंपळे गुरव : बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण काही दिवसांवर आला असल्याने नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील बाजारपेठ सजली आहे. रेशमी गोंडा मिनार वर्क, कुंदन, चांदी वर्क आणि कार्टून राख्यांची यंदा क्रेझ असल्याचे दिसत आहे.
बाजारपेठेत विविध आकर्षक आकाराच्या राख्या विक्रीस उपलब्ध होत आहेत. दहापासून सहाशे रुपयांपर्यंत विविध रंगीत आकर्षक राख्या विक्रीस पाहायला मिळत आहेत. व्यावसायिकानी विषेतः लहान मुलांचा विचार करत यावर्षी डोरेेमॅन, मोटू पतलु, हनुमान, कृष्णा, शिवा, स्मायली एमोजी, पंडा आदी राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साधारण 35 रुपयांपर्यंत या राख्या मिळत आहेत.

तसेच, बाजारात संगीतमय राख्या 80 रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. बाहुली, मोबाईल, विमान, डोनाल्ड, कॅमेरा कार, बाहुली आकाराच्या राख्या पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहेत. मोठ्या मुलांकरिता मनी मोती, मिनार राजस्थानी आकर्षक राख्या दहापासून ते 70 रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. गोंड्याच्या राख्या, चांदीच्या मुलावा असलेल्या राख्या दहा रुपयांपासून विक्रीस आहेत. रेशमी बटव्यात सुंदर आकर्षक राख्या किंमत जवळपास दीडशे रुपयांना मिळतात. रक्षाबंधननिमित्त पूजेसाठी ताट दीडशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. बाहेर गावी असलेल्या आपल्या भावाला पोस्टाने राख्या पाठवण्याकरिता महिलांची लगबग पाहायला मिळत आहे.

भोसरी परिसरात रंगबिरंगी राख्या
भोसरी : रक्षाबंधन सणासाठी परिसरात राख्यांची दुकाने सजू लागली आहेत. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या भोसरीतील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
श्रावण महिना सुरू होताच विविध सणांना सुरुवात होते. राखी पौर्णिमेनिमित्त भोसरी बाजारपेठेत तसेच परिसरातील विविध भागात बाजारपेठेत आकर्षक राख्यांनी दुकाने सजायला सुरुवात झाली आहे. विविध प्रकारचा रंगबिरंगी राख्या दुकानात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. एकच ठिकणी अनेकविध राख्या उपलब्ध असल्याने ग्राहक भोसरीतील बाजारपेठस पसंती देत आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांची घटलेली संख्या तसेच निर्बंध शिथिल करीत सर्व बाजारपेठा खुल्या करण्यास मुभा मिळाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदी चांगली होत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.
लहान मुलांमध्ये लोकप्रिय व आकर्षण असलेल्या कार्टून राख्या लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, पारंपारिक प्रकारच्या गोंडा राख्या, देव राखी, लाल बारीक धाग्यांच्या राख्यांनादेखील मागणी असल्याचे चित्र आहे.
बाजारामध्ये पाचपासून 350 रुपयांपर्यंत राखी उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चांदीची राखी,धातूपासून बनविलेल्या, रुद्राक्ष तसेच धर्मिक चिन्ह असलेल्या स्वस्तिक, ओम आदी राख्यांनादेखील मागणी आहे.

Back to top button