पुणे : गहू,आटा, मैदा, खाद्यतेले महागली; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेचेही दर वाढले | पुढारी

पुणे : गहू,आटा, मैदा, खाद्यतेले महागली; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेचेही दर वाढले

पुणे : तुटवड्यामुळे गव्हाच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ झाली असून आटा, रवा आणि मैद्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले. सरकी, सोयाबीन आणि पामोलीन तेलाच्या व खाद्यतेल दरात 15 किलोमागे 50 ते 75 रुपयांनी, तुरडाळ आणि उडीदडाळीच्या दरात क्विंटलमागे 500 रुपयांनी, तर नारळाच्या दरात शेकड्यामागे 50 ने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवड्यात येथील घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे 50 रुपयांनी वाढ झाली.

केंद्र सरकारने गेल्या शनिवारी ऑगस्ट महिन्यासाठी 22 लाख टनांचा साखरेचा कोटा जाहीर केला. या महिन्यातील नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव हे महत्त्वाचे सण असल्यामुळे किमान 23 लाख टनाचा कोटा जाहीर होईल, असा अंदाज होता. मात्र, असे न झाल्यामुळे येथील घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे 50 रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रति क्विंटलचा दर 3550 ते 3600 रुपये होता. वाढीव मागणी पूर्ण करण्याकरिता जादा कोटा खुला न झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गहू, रवा, मैद्याच्या दरात मोठी वाढ
हलक्या प्रतीच्या मिलबर गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. यामुळे आटा, रवा मैदा तयार करणार्‍या मिल्सना गव्हाच्या तुटवड्यास तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, मिलबर गव्हाचे दर सातत्याने वाढत असून, गेल्या आठवड्यातही या गव्हाच्या दरात क्विंटलमागे 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली. सध्या सणासुदीमुळे रवा आणि मैद्यास मागणी वाढत असून गव्हाच्या दरवाढीमुळे आटा, रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे आणखी 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली. मागणी वाढल्याने सौराष्ट्र आणि मध्य प्रदेश लोकवन गव्हाचे दरही क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढले. ज्वारी, बाजरीचे दर स्थिर होते. तांदळाची दरवाढ कायम असल्याचे सांगण्यात आले.
श्रावणातील सणांमुळे नाराळास सार्वत्रिक मागणी वाढली असून सर्व प्रकारच्या नारळाच्या दरात शेकड्यामागे आणखी 50 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

खाद्यतेलांमधील घसरण थांबली
सणासुदीमुळे खाद्यतेलांची मागणी वाढत आहे, यामुळे खाद्यतेलांच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आता थांबली आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीन आणि पामोलीन तेलाच्या दरात 15 किलोमागे 50 रुपयांनी तर तुटवड्यामुळे सरकी तेलाच्या दरात 75 ते 100 रुपयांनी वाढ झाली. वनस्पती तूपही 30 ते 40 रुपयांनी महागले. मात्र, खोबरेल तेलाच्या दरात 100 ते 150 रुपयांनी घसरण झाली. अन्य सर्व खाद्यतेलांचे दर स्थिर होते.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे :
साखर (प्रतिक्विंटल) 3550-3650 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2750-2800, रिफाईंड तेलः 2500-3100, सरकी तेल 2200-2600, सोयाबीन तेल 1950-2150, पामतेल 1850-2100, सूर्यफूल रिफाईंड तेल 2400-2600, वनस्पती तूप 1650-2450, खोबरेल तेल 2250 रु.

तांदूळ :- गुजरात उकडा 3500-3800, मसुरी 3300-3500, सोनामसूरी 4000-4300, एच.एम.टी. कोलम 4700-5000, लचकारी कोलम 5000-5500, चिन्नोर 4000-4500, 1121-1000-10500, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11000-12000, बासमती दुबार 8000-9000, बासमती तिबार 9000-10000, बासमती मोगरा 5000-5500, बासमती कणी 3000-3500, 1509-7500-8500 रु.

गहू :- सौराष्ट्र लोकवन नं. 1 3500-3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3400, एम.पी. लोकवन 2900-3600, सिहोर नं. 1 4800-5500, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3200-3600, मिलबर 2750 रु. ज्वारी :- गावरान नं. 1-4200-4500, गावरान नं. 2-3400-3800, नं. 3 3000-3200, दूरी 3200-3200 बाजरी :- महिको 3000-3200, गावरान 2700-2800, हायब्रीड 2600 रु.
गूळ :- गूळ एकस्ट्रा 3750-3900, गूळ नं.1 3500-3700, गूळ नं.2 3300-3450, गूळ नं.3 3150-3250, बॉक्स पॅकिंग 3500-4700 रु. डाळी :- तूरडाळ 9500-11000, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 8500-8700, मसूरडाळ 8500-8600, मटकीडाळ 11500-11800, उडीदडाळ 9000-11000 रु.

कडधान्ये :- हरभरा 5500-5600, हुलगा- 6500-7000 चवळी 7500, चवळी भारी 8000 मसूर 7800-8000, मूग 7700-8500, मटकी गावरान 12500, मटकी पॉलिश 9600-9700, मटकी गुजरात 9600-9700, मटकी राजस्थान 9600-9700, मटकी सेलम 13200-13700, वाटाणा हिरवा 5000-5500, वाटाणा पांढरा 6500-6700, काबुली चणा 9000-11000 रु.

साबुदाणा :- साबुदाणा नं.1 5500, साबुदाणा नं.2 5200, साबुदाणा नं.3 5000 रु. वरई भगर :-11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1650-1850 रु. शेंगदाणा :- जाडा 10500-11000, स्पॅनिश – 11000, घुंगरु 10200, टीजे 9100 रु. धने :- गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल 2450-2550, पिवळा 2475-2525, पांढरा 2700-2900 रु.

पोहे :- मध्य प्रदेश 3650-3850, पेण 3450-3650, मध्यम पोहा-3450-3650, दगडी पोहा 3400-3900, पातळ पोहा 4100-4500, सुपर पोहा 3850-4250, भाजका पोहा 475-525, मका पोहा 600-650, भाजके डाळे 3300-3500, मुरमुरा (10 किलोस) 420-430, भडंग 675-775, घोटी 430, सुरती 440 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1450-1525, रवा 1530-1575, मैदा 1530-1575 रु. बेसन :- (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची :- काश्मीरी ढब्बी 45000-47000.

Back to top button