पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ! एक लाखाच्या गर्दीचे आव्हान : पदाधिकार्‍यांनी कसली कंबर | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ! एक लाखाच्या गर्दीचे आव्हान : पदाधिकार्‍यांनी कसली कंबर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सोमवारी (दि. 29) पुण्यात येत असून, त्यांच्या सभेला मोठी गर्दी जमविण्याच्या तयारीला महायुतीतील सर्व पक्ष लागले आहेत. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांतून लोक सभास्थानी आणण्याची जबाबदारी या पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांना त्यासाठी लक्ष्य निश्चित करून देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच चारही मतदारसंघांतील प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक शुक्रवारी (दि.26) झाली. सभेचे नियोजन, कोणत्या भागातून किती कार्यकर्ते आणि नागरिक जाहीर सभेला येणार, याचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. चंद्रकांत पाटील म्हणाले, आजपर्यंत अशी सभा झाली नाही अशी भव्य सभा करण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. पंतप्रधान मोदी हे कराडमधील सभा संपवून पुण्याला सोमवारी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यासोबत येतील. मोदी यांचा त्या दिवशी पुण्यातील राजभवनात मुक्काम असेल. रोड शोसंदर्भात अद्याप काही ठरलेले नाही.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांची सभा पुण्यात असल्याने पुण्यातून जास्तीत जास्त नागरिक रेसकोर्स मैदानावरील सभेला उपस्थित राहतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पुण्यात भाजपचे शंभर नगरसेवक, पाच आमदार, संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्या प्रत्येकावर नागरिक आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे शहरातून पन्नास हजारांपेक्षा अधिक नागरिक सभेला येतील. त्याव्यतिरिक्त अन्य मतदारसंघांतून नागरिक येतील. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे म्हणाले, रेसकोर्सवरील सभेला दोन लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने सभास्थानाची व्यवस्था तसेच अन्य व्यवस्था करण्यात कार्यकर्ते सध्या युद्धपातळीवर तयारी करत आहेत.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, पुणे शहरातील प्रत्येक मतदारसंघातून किमान दहा ते पंधरा हजार नागरिक सभेसाठी पोहोचावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या दृष्टीने मोदी यांची जाहीर सभा ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. शिरूर मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघात ही सभा होत आहे. बारामती मतदारसंघातील पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ हेही जवळच आहेत. शिरूर आणि बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार आहेत. त्यांच्याही प्रचारासाठी पंतप्रधान येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक सभेसाठी आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पिंपरीतून नागरिक आणण्याचे प्रयत्न

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश मावळ आणि शिरूर मतदारसंघात होतो. मावळमध्ये महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, भोसरी या भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक जाहीर सभेसाठी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button