एकाच दिवसात 1 लाख 79 हजार 300 उतारे डाऊनलोड | पुढारी

एकाच दिवसात 1 लाख 79 हजार 300 उतारे डाऊनलोड

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महसूल विभागाच्या इतिहासात 29 जुलैला विक्रम झाला. या एकाच दिवशी राज्यभरातील 1 लाख 37 हजार नागरिकांनी 1 लाख 79 हजार 300 उतारे आणि मिळकतपत्रिका डाऊनलोड केल्या. ई-फेरफार प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा आणि खाते उतार्‍यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक 8-अ) मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्यावर नागरिकांकडून भर देण्यात आला आहे. या सुविधेचा वापर करून 29 जुलैला सात-बारा आणि फेरफार उतारे डाऊनलोड करण्याचा राज्यातील आतापर्यंतचा उच्चांक झाला.

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा आणि 8-अ उतारे नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. गेल्या काही महिन्यांपासून मिळकतपत्रिका देखील मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी सात-बारा उतार्‍यांबरोबर खाते उतारे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत. त्यानुसार एका दिवसात 1 लाख 80 हजार डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा आणि खाते उतारे, तसेच मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करण्यात आल्या. त्यात 1 लाख 24 हजार सात-बारा उतारे आहेत.

8-अ उतारे 47 हजार, 3100 डिजिटल स्वाक्षरीयुक्त फेरफार, 5200 डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळकतपत्रिका आहेत. एकाच दिवसात 1 लाख 79 हजार 300 एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध उतारे डाऊनलोड केल्याने शासनाला 31 लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.

ऑनलाइन उतारे आणि मिळकतपत्रिकाही
जमाबंदी आयुक्तालयाने महाभूमी संकेतस्थळावरून ऑनलाइन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा, 8-अ उतारे आणि मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एका दिवसात डाऊनलोड झालेले सर्वाधिक उतारे
25 जुलै 2022 एक लाख 70 हजार
18 जुलै 2022 एक लाख 64 हजार
23 मे 2022 एक लाख नऊ हजार
19 एप्रिल 2022 एक लाख दोन हजार
14 फेब्रुवारी 2022 एक लाख
16 जून 2021 62 हजार
7 एप्रिल 2021 38 हजार
16 मार्च 2021 40 हजार 200
22 फेब्रुवारी 2021 46 हजार

 

Back to top button