अकरावी प्रवेशासाठी खेळाडू कोट्यातील विद्यार्थी वंचित | पुढारी

अकरावी प्रवेशासाठी खेळाडू कोट्यातील विद्यार्थी वंचित

सुनील जगताप

पुणे : राज्यात सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, या प्रवेश प्रक्रियेत खेळाडू कोट्यातील विद्यार्थी वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. या प्रवेश अर्जामध्ये केवळ राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचाच उल्लेख असल्याने राज्यस्तरीय स्पर्धेतील पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत.

त्यांतर्गत नियमित प्रवेश फेरी क्रमांक एकसाठीचे वेळापत्रक संचालनालयाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यानुसार प्रवेश अर्ज भाग एक आणि भाग दोन अशा दोन टप्प्यात अर्ज भरावयाचे आहेत. भाग एकमध्येच खेळाडूंच्या 5 टक्के आरक्षणाचा कोटा असलेला कॉलम आहे. परंतु, यावर क्लिक केले असता तेथे केवळ राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीबाबत उल्लेख असल्याने राज्यपातळीवर खेळलेल्या खेळाडूंना या कोट्याचा फटका बसत आहे. या समस्येवर क्रीडा विभाग आणि शिक्षण विभागाकडून कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे उचित ठरेल.

अकरावीला प्रवेश घेत असताना केवळ राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीचाच उल्लेख असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. वास्तविक, केवळ राज्यस्तरीय नाही, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना प्रवेशामध्ये 5 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाने यावर त्वरित निर्णय घेऊन जिल्हास्तरावरील खेळाडूलाही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सेंट मीरा महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा पाठक यांनी केली.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये केवळ राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीचा उल्लेख असल्याबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार आलेली नाही, वस्तुस्थिती पाहून शिक्षण विभागाशी चर्चा केली जाईल. राज्यपातळीवरील कामगिरीचाही उल्लेख या 5 टक्के आरक्षणांतर्गत असणे गरजेचे आहे.
               – ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

Back to top button