‘एमपीएससी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; उत्तरतालिकेच्या याचिका फेटाळल्या | पुढारी

‘एमपीएससी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; उत्तरतालिकेच्या याचिका फेटाळल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 च्या उत्तर तालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) फेटाळण्यात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक एमपीएससीतर्फे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 ही परीक्षा 11 सप्टेंबरला, पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा 25 सप्टेंबरला, राज्य कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा 15 ऑक्टोबरला, सहायक कक्ष अधिकारी पदासाठीची परीक्षा 16 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 ची उत्तर तालिका 25 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तर तालिकेवर आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे 29 जानेवारीला होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. या याचिका तीनही खंडपीठांकडून फेटाळण्यात आल्याने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक एमपीएससीने जाहीर केले. मुख्य परीक्षेसाठी 10 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले.

Back to top button