पुणे : गणेश मंडळाला दोनच कमानी उभारण्यास परवानगी | पुढारी

पुणे : गणेश मंडळाला दोनच कमानी उभारण्यास परवानगी

पुणे : गणेशोत्सवासाठी शहर पोलिसांनी 39 कलमी नियमावली बुधवारी जाहीर केली. यात आता प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोनच कमानी उभारता येतील. कमानीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसावी. त्याही मंडळाच्या शंभर फुटांच्या आत असाव्यात. कमानीचा जमिनीपासून दहा फुटांपर्यंतचा भाग चेकिंगसाठी देखील खुला ठेवावा लागणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साधेपणाने साजरा झालेला गणेशोत्सव यंदा मात्र धूमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी पुणे पोलिसांची नियमावली जाहीर झाली आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काही अटी घातल्या असून, गणेश मंडळांना त्याचे पालन करावे लागणार आहे.

पोलिस आयुक्तांनी घेतली बैठक
गणेशोत्सवासंदर्भात पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. बैठकीला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण यांच्यासह सर्व झोनचे पोलिस उपायुक्त आणि सुनील रासणे, महेश सूर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण परदेशी, विकास पवार, नितीन पंडित, पुनित बालन, धीरज घाटे, भाऊ करपे, प्रमोद कोंढरे, सुनील पांडे, ऋग्वेद निडगुडकर, विश्वास भोर, बाळासाहेब मारणे, भूषण पंड्या आदी उपस्थित होते.

नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे…

मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी बंधनकारक.
गणपती स्थापनेपूर्वीच मंडळांना पोलिस परवाना बंधनकारक.
परवाना तत्काळ मिळण्यासाठी पोलिस ठाण्यात एक खिडकी योजना.
वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा करता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्त्याचा एकतृतीयांश भाग उपयोगात येईल, असा मंडप बांधण्यापूर्वीच परवाना प्राप्त करावा.
गणेशमूर्तीची उंची मर्यादित असावी, मूर्ती पारंपरिक असल्यास देखाव्याची उंची मर्यादित असावी.
ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीनुसार करावा
शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांच्यासभोवताली 100 मीटर परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.

गेल्या तीन वर्षांत एकदा परवाना घेतलेला असेल तर अशा गणेश मंडळाना तत्काळ परवाना दिला जाईल. मंडळांकडून परवान्यासाठी अर्ज आल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
                                                       – संदीप कर्णिक, सहपोलिस आयुक्त, पुणे

Back to top button