मोशीतील देहू रस्ता चौकातील तिसरा डोळा बंद | पुढारी

मोशीतील देहू रस्ता चौकातील तिसरा डोळा बंद

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशी परिसरात महामार्गावर देहू रस्ता चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी कृत्यावर लक्ष ठेवणे अवघड जात आहे. पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सीसीटीव्ही बंद असल्याचा फायदा गुन्हेगारांना होत आहे; तसेच एखादी अपघाताची घटना घडल्यास त्याच्या तपासात देखील अडचणी निर्माण होवू शकतात. येथील चौकातून तीर्थक्षेत्र देहू, आळंदी देवाची, भोसरी,  चाकण आदी ठिकाणी ये-जा करणारी वाहनांची मोठी गर्दी असते.

सायंकाळच्या वेळी महामार्गावर मोठी वाहतूककोंडी उद्भवते. अशावेळी अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सिग्नल तोडत असतात. अनेकदा यामुळे किरकोळ अपघात देखील घडतात; मात्र सीसीटीव्ही बंद असल्याने या घटनांवर नजर ठेवली जात नाही.
रात्रीच्या वेळी नवीन बीआरटी रस्त्यावर मद्यपी फिरत असतात. त्यांचा धिंगाणा सुरू असतो; मात्र सीसीटीव्ही बंद असल्याने त्यांना पकडणे देखील अवघड जाते.यामुळे सदर चौकातील सीसीटीव्ही तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करत आहेत. त्यामुळे पालिकेने या मागणीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

हीच अवस्था इतर चौकात देखील असून मोशी भागातील चौकात लावलेली सीसीटिव्ही यंत्रणा कोलमडली आहे. याकडे देखील पालिकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे; मात्र पालिका, पोलिस प्रशासन गेले कित्येक दिवसांपासून या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Back to top button