सुनेने घराचा दरवाजा बदलून केली चोरी | पुढारी

सुनेने घराचा दरवाजा बदलून केली चोरी

पुणे : मालमत्तेच्या वादातून सुनेने घराचा दरवाजा बदलून त्याच्यावर स्वतःच्या नावाचा फलक लावला. त्यानंतर घरातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरी करून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सासू मुलीकडे गेल्याची संधी साधून सुनेने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी हडपसर येथील गाडीतळजवळ राहणार्‍या 65 वर्षांच्या महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी 26 वर्षांच्या सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 19 ते 23 जुलैदरम्यान घडला. फिर्यादी आणि त्यांची सून यांच्यात मालमत्तेवरून वाद आहेत. फिर्यादी या लहान मुलीसोबत त्यांच्या मोठ्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून घराचा दरवाजा बदलला. त्याच्यावर तिने स्वत:च्या नावाचा फलक लावला. घरातील लोखंडी कपाटातील 9 तोळे 3 ग्रॅम सोने, 570 ग्रॅम चांदीचे दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Back to top button