पुणे : शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न | पुढारी

पुणे : शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनानंतर सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे. गुणवत्तेसोबतच भौतिक बाबीही पुरविण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत 403 शाळा या आदर्श करण्यात येणार आहेत. आदर्श शाळा करण्यासाठी शिक्षकांचे कौशल्य त्रुटी शोधण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या उपक्रमासाठी निवडण्यात आलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या पाठाचे सादरीकरण शाळास्तरावर केंद्रप्रमुख व विषय शिक्षक यांच्याद्वारे घेण्यात आले.

हे पाठ निरीक्षण 60 गुणांसाठी ठेवण्यात आले होते. शाळांची निवड करताना शाळेमध्ये दीडशे पटसंख्येचा निकष लावला होता. या शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षण गरजा निश्चितीसाठी आशय ज्ञान, अध्यापन शास्त्रीय कौशल्य, मानसशास्त्रीय व अध्यापकीय दृष्टिकोन या घटकांवर आधारित भाषा, गणित, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या विषयांवर आधारित चाळीस गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी घेण्यात आली.

त्यामध्ये 3 हजार 330 शिक्षकांपैकी 2 हजार 440 शिक्षक ऑनलाईन चाचणी पूर्ण करू शकले. तर इतर 890 शिक्षक तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन चाचणी पूर्ण करू शकले नाही. शिक्षकांच्या ऑनलाईन चाचणीवरून कौशल्य त्रुटी निश्चित करण्यात आल्या. यातील काही शिक्षकांना क्षमता संवर्धनासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शिक्षकांना गुरुवार (दि.21), शुक्रवार (दि.22) दोन दिवस ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.

भौतिक बाबींमध्ये या होणार सुधारणा…
शाळा आदर्श करत असताना गुणवत्तेच्या सोबतच शाळांमधील भौतिक बाबींकडेदेखील लक्ष दिले जात आहे. विविध निधीमधून शाळांमध्ये शौचालय, वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीमाभिंत बांधली जाणार आहे. यासाठी शाळांमधील त्रुटी शोधून (गॅप अ‍ॅनेलिसेस) त्या देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

दर तीन महिन्यांनी होणार मूल्यमापन..
आदर्श शाळांमध्ये निवड झालेल्या शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी एक व्यवस्था उभारली जाणार आहे. त्याद्वारे शाळांवर लक्ष राहणार आहे. शाळांची प्रगती कशी होते आहे, यावर बारकाईन लक्ष दिले जाईल. केवळ भौतिक गोष्टींकडेच नाही, तर जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ताही चांगली राहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद.

Back to top button