पुणे : धक्कादायक! महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार | पुढारी

पुणे : धक्कादायक! महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून वाद झाला असताना कॉलेजवर येऊन तेथून दुचाकीवरून जबरदस्तीने चाकणला पळवून नेऊन तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी शेरखान शब्बीर सय्यद (वय 25, रा. वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 20 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार महाविद्यालयापासून चाकण एमआयडीसी येथील वीटभट्टीजवळील एका खोलीत बुधवारी दुपारी 2 ते गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडला.

फिर्यादी व आरोपी शेरखान सय्यद यांच्यात एक महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे फिर्यादी तरुणी त्याच्याशी बोलत नव्हती. दरम्यान, 20 जुलै रोजी ती कॉलेजला गेली असताना, आरोपी तेथे आला. फिर्यादी यांना तुझ्याशी 5 मिनिटे बोलायचे, असे सांगून त्याचा मित्र अजय यादव याच्या दुचाकीवर ते ट्रिपल सिट बाहेर आले. काही अंतरावर गेल्यानंतर शेरखान याने मित्राला जाण्यास सांगितले. त्यानंतर तो फिर्यादी यांना मोटारसायकलवरून चाकण येथे घेऊन गेला.

तेथे बंद खोलीत नेले. फिर्यादी यांनी विचारणा केल्यावर ‘तू आरडाओरडा केला, तर तुला येथेच मारून टाकील,’ अशी धमकी देऊन फिर्यादीवर बलात्कार केला. फिर्यादीने विरोध केला असता, त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना पुन्हा मोटारसायकलवरून कॉलेजजवळ आणून सोडून दिले व तो पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक कवटीकर तपास करीत आहेत.

 

Back to top button