पुण्याच्या दक्षिण भागात एकत्र मिरवणूक; मंडळ देणार एकात्मतेचा संदेश | पुढारी

पुण्याच्या दक्षिण भागात एकत्र मिरवणूक; मंडळ देणार एकात्मतेचा संदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पुण्याच्या दक्षिण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणुकीचा अभिनव निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच श्री गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी पुण्याच्या धनकवडी भागातील सात गणेशोत्सव मंडळे एकात्मतेचा संदेश देत एकत्रित मिरवणूक काढणार आहेत. यातून वाढीव खर्च टाळून कमी खर्चात एकत्र मिरवणूक होऊ शकते आणि एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होणार आहे.

नुकत्याच झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत धनकवडी भागातील मंडळांनी एकत्रित एकच मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. केशव मित्र मंडळ ट्रस्ट, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजीनगर मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, अखिल मोहननगर मित्र मंडळ ट्रस्ट आणि एकता मित्र मंडळांनी एकत्रितपणे मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ही मंडळे वेगवेगळी मिरवणूक न काढता एकच मिरवणूक काढून एक वेगळा संदेश देणार आहे. या विषयी ‘अखिल मोहननगर मित्र मंडळ ट्रस्ट’चे विश्वस्त गुरुनाथ साळुंके म्हणाले, ‘धनकवडी भागातील मंडळांचीही बैठक झाली. त्यामुळे काही मंडळांनी एकत्र येऊन एकच मिरवणूक गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. समविचाराने एकत्र आली आहे. आणखी काही मंडळे यात सहभागी होणार आहेत.’

Back to top button