वडगाव नगरपंचायतला ओडीएफ ++ मानांकन | पुढारी

वडगाव नगरपंचायतला ओडीएफ ++ मानांकन

वडगाव मावळ : केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ओडीएफ ++, स्टार मानांकन या स्वच्छता विषयक स्पर्धेत वडगाव नगरपंचायतने पहिल्याच प्रयत्नात मानांकन प्राप्त केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या समिती मार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्या दरम्यान ओडीएफ ++ (हागणदारी मुक्तीचा पुढील टप्प्या)ची गोपनीय तपासणी करण्यात आली होती. तसेच, शहरातील सर्व सार्वजनिक शौचालय, रहिवासी, व्यापारी, सार्वजनिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती. नगरपंचायत स्थापनेनंतर केंद्र शासनामार्फत प्रथमच ही तपासणी करण्यात आली असून, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन वडगांव नगरपंचायतने ओडीएफ ++ मानांकन दर्जा मिळविला आहे.

ओडीएफ अभियान हा स्वच्छ सर्वेक्षण, स्टार मानांकण, माझी वसुंधरा या सर्व अभियानाचा पाया आहे. ओडीएफ ++ निकालानंतर या सर्व अभियानात प्रदान करण्यात येणार्‍या बक्षिससाठीचा पात्रतेचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात नगरपंचायतच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा या अभियानात गुणांनुक्रम उचविण्यासाठी या यशाचा फायदा होईल, असा विश्वास नगराध्यक्ष ढोरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकारी जयश्री काटकर, सर्व नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, नागरिक, नगरपंचायत अधिकारी, सर्व सफाई कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे नगराध्यक्ष ढोरे यांनी सांगितले.

Back to top button