पुणे : चोरटे हेरताहेत बंद सदनिका; दोन घरफोड्यांत साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुणे : चोरटे हेरताहेत बंद सदनिका; दोन घरफोड्यांत साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: धनकवडी व बिबवेवाडी परिसरात दोन बंद सदनिकांवर डल्ला मारून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिणे असा 9 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. तर सदाशिव पेठ आणि खराडी येथे कारमधील लॅपटॉप चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनवकडी परिसरातील गणेश व्हिला सोसायटीतील एका बंद सदनिकेवर भरदिवसा चोरट्यांनी हात साफ करून 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरी केले. याप्रकरणी नवनाथ कांबळे (वय 20, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली आहे. बिबवेवाडी येथील अनंत वसाहत येथीलही एका बंद सदनिकेवर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारून रोकड, सोन्याचे दागिणे व परदेशी चलन असा 4 लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी मिलिंद भावसार (वय 62, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी पावणेअकरा ते दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे.

लॅपटॉप चोरीला
सदाशिव पेठ व चिलीज हॉटेल खराडी येथून कारमधील तीन लॅपटॉप चोरट्यांनी चोरी केले. सदाशिव पेठेत महेश वरपे (वय 41, रा. सहकारनगर) हे त्यांची इनोव्हा गाडी पार्क करत होते. पुढील चाक पंक्चर झाल्याचा त्यांना संशय आल्याने ते खाली उतरून टायर पाहत होते. त्या वेळी अज्ञात चोरट्याने पाठीमागील दरवाजा उघडून 40 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप बॅगसह चोरी केला. हा प्रकार घडल्यानंतर वरपे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बसप्रवासात महिलेच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला
गेल्या काही दिवसांपासून शहरातील बसप्रवासात महिलांचा ऐवज चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. गुरुवारी सायंकाळी पीएमपीएलच्या बसमधून उतरत असताना एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी मंगळसूत्र, रोकड व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा 30 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी खराडी येथील एका 22 वर्षीय महिलेने चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button