पुणे : उंडवडी-सुपे रस्ता चिखलमय | पुढारी

पुणे : उंडवडी-सुपे रस्ता चिखलमय

उंडवडी, पुढारी वृत्तसेवा : उंडवडी ते सुप्याला जाणार्‍या रस्त्यावरील उंडवडी सुपे येथील बाजारतळासमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचले असून, सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उंडवडी कारखेल मार्गे सुप्याला जाणार्‍या रस्त्याचे काम चालू असून, काही ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे. उंडवडी ते कारखेल रस्ता हा कित्येक दिवसांपासून कामावाचून अर्धवट पडला आहे. उंडवडी येथील रस्त्यावर मध्यंतरी नुसताच मुरुम टाकला होता; परंतु रिमझिम पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. चालत जाणेही अवघड झाले आहे. चिखलामुळे व खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे डासची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांच्या आरोग्यवरही मोठा दुष्परिणाम होण्याची भीती नागरीक व्यक्त करत आहेत.

कोणाचा बळी गेल्यावरच जाग येणार का?

शेजारीच जि. प. शाळा असून शाळेत मुलांना अक्षरक्ष: चिखल तुडवत जावे लागत आहे. दोन, तीन वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीविना असून, संबंधित विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. संबंधित ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्याने रस्त्यावर मोठा अपघात होऊन कोणाचातरी बळी गेल्यानंतरच रस्ता दुरुस्ती होतो की काय, असा सवाल नागरीक करत आहेत.
उंडवडी-सुपे येथील बाजारतळासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पाणीही साचले आहे.

Back to top button