पर्यटननगरी लोणावळ्यात जलतरण तलावांची सुरक्षा अधांतरी | पुढारी

पर्यटननगरी लोणावळ्यात जलतरण तलावांची सुरक्षा अधांतरी

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : पर्यटननगरी लोणावळा शहरात आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेल्या एका दोन वर्षांच्या चिमुकल्याला जलतरण तलावात पडून आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. मात्र या घटनेमुळे लोणावळा शहरातील शेकडो खाजगी बंगल्यात तसेच छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये बांधण्यात आलेल्या जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोणावळा शहरात खाजगी बंगले भाड्याने देण्याचा एक मोठा ट्रेंड सध्या सुरू आहे. येथे येणारे अनेक पर्यटक हॉटेल पेक्षा अशा बंगल्यांना जास्त पसंती देतात. मात्र त्यातही ज्या बंगल्यात जलतरण तलाव आहे असे बंगले प्राधान्यक्रमाने आणि जास्त पैसे देऊन बुक केले जातात. त्यामुळे अशा बंगले धारकांकडून आपल्या बंगल्याच्या किंवा रो हाऊसच्या आवारात ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल तेथे अक्षरशः हवा तसा खड्डा खणून जलतरण तलाव तयार केला जातो.

असे बेकायदा जलतरण तलाव असलेले शेकडो, हजारो बंगले लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरात आहे; परंतु विशेष म्हणजे याबाबतची कोणतीही आकडेवारी संबंधित प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यात दुर्दैवाची गोष्ट ही की, ज्या बंगल्याच्या जलतरण तलावात वरील घटना घडली, त्या बंगल्यातील तलाव हा अधिकृत आहे की अनधिकृत याची माहिती देखील नगरपरिषद प्रशासनाला देता आली नाही.

लोणावळा आणि परिसरातील बंगले ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणार्‍या केवळ एका संकेतस्थळाला भेट दिली असता त्याठिकाणी तब्बल 224 बंगल्यात जलतरण तलाव असल्याचे निदर्शनास आले. ही आकडेवारी केवळ एका संकेतस्थळाची आहे. अशा अनेक वेगवेगळी संकेतस्थळे आहेत. एकूणच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलतरण तलाव असताना त्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसणं हा केवळ प्रशासनाचा नाकर्तेपणा दर्शवीत आहे.

जलतरण तलावासाठी परवानगी देत असताना अनेक सुरक्षा मानके निर्धारित करून देणे गरजेचे असते. शिवाय संबंधित विभागाने त्याची तपासणी देखील करण देखील आवश्यक असते. लोणावळा नगरपरिषदेच्या बांधकाम परवाना विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, तपासणी करताना नेमके काय करावे याबाबत स्पष्ट आदेश कुठेच दिसत नसल्याने हा विभागही त्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. जलतरण तलावाचे काही नियम शासनाने निर्धारित करून दिलेले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी देखील याठिकाणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

जलतरण तलाव वापराबाबतचे प्राथमिक नियम
जलतरण तलावाची खोली 4 फूट 6 इंच यापेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास त्याठिकाणी सदैव प्रशिक्षित जीवरक्षक तैनात असावा.
जलतरण तलावाच्या भोवताली सुरक्षा साखळी अथवा जाळी असावी.
जलतरण तलावाच्या ठिकाणी जलतरण तलाव सुरू होण्याची आणि बंद करण्याची वेळ नमूद करण्यात आलेली असावी.
जीवरक्षक तैनात नसल्यास तशी सूचना त्याठिकाणी स्पष्ट दिसेल, अशा ठिकाणी लावण्यात आलेली असावी.
वरील नियमांच्या व्यतिरिक्त जलतरण तलावातील फरशा आणि आसपासच्या परिसराची दुरुस्ती- डागडूजी केली जाते का, यासारख्या अनेक गोष्टींचा आढावा तलावाची नित्याने तपासणी केल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तलावांची नित्याने तपासणी गरजेची आहे. मात्र ते कोठेही होताना दिसत नाही.

Back to top button