पुणे : गावरान कोंबड्यांची चलती; 700 ते 800 रुपयांना विक्री | पुढारी

पुणे : गावरान कोंबड्यांची चलती; 700 ते 800 रुपयांना विक्री

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आखाडातील धार्मिक कार्यक्रमांसाठी मंगळवार पेठ येथील स्व. इंदिरा गांधी कोंबडी बाजारात गावरान कोंबडा खरेदीसाठी पुणेकरांची पावले वळू लागली आहेत. आखाडाच्या पार्श्वभूमीवर गावरान कोंबड्याची 700 ते 800 रुपयांना तर कोंबडीची 400 तेे 500 रुपयांना विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील यवत व चाकण येथील आठवडे बाजार व आजूबाजूच्या गावांतून खरेदी केलेले गावरान कोंबडे विक्रीसाठी मंगळवार पेठेतील बाजारात आणण्यात येतात. एक ते अडीच किलोपर्यंतच्या कोंबड्यांचा यात समावेश असतो.

आखाडाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या धार्मिक कार्यक्रमासाठी दीड ते दोन वर्षांच्या आरवणार्‍या नर जातीच्या कोंबड्याला प्राधान्य दिले जाते. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा, जत्रांवर आलेले निर्बंध शिथील झाल्याने यंदा बाजारात कोंबड्याची चांगली आवक होत असून त्यांना मागणीही होत आहे. गतवर्षी मागणीच्या तुलनेत कोंबडे बाजारात कमी असल्याने त्याचे दर एक हजारांपर्यंत गेले होते. यंदा, बाजारात मोठ्या प्रमाणात कोंबडे उपलब्ध आहेत. त्यामुळे, गतवर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत.

बहुतांशजण श्रावणात मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आषाढाच्या शेवटच्या टप्प्यात मांसाहार चांगलाच ताव मारला जातो. त्यासाठी मटण, चिकन यांची खरेदी तर केली जातेच. शिवाय गावठी कोंबड्यांना अधिक मागणी असते.

                                                                              – नितीन जाधव, विक्रेते

 

Back to top button