पुणे : नकाशाद्वारे कळणार पीएमपी मार्ग ‘डिझाईन स्टुडिओ’ उपक्रम | पुढारी

पुणे : नकाशाद्वारे कळणार पीएमपी मार्ग ‘डिझाईन स्टुडिओ’ उपक्रम

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अमूक-अमूक क्रमांकाची पीएमपीची बस कोणत्या मार्गावर जात आहे, स्थानकाच्या बाजूचा परिसर कोणता आहे. शिवाजीनगर व अन्य ठिकाणी जाण्यासाठी कोणती बस धरावी, ही माहिती प्रवाशांना आता नकाशाद्वारे मिळणार आहे. पीएमपी प्रशासनाने शहरातील सर्व बस स्थानकांवर अशा प्रकारचे नकाशे बसविण्याचे नियोजन केले आहे. ‘पीएमपी डिझाईन स्टुडिओ’ उपक्रमात सध्या तीन स्थानकांवर अशा प्रकारचे नकाशे लावण्यात आले आहेत. लवकरच आणखी 40 स्थानकांवर हे नकाशे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या संचलनाबाबतची तत्काळ माहिती मिळणार आहे.

हे नकाशे डिझाईन स्टुडिओचे योगेश दांडेकर यांनी पीएमपी प्रशासनाच्या मदतीने तयार केले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे स्टेशन, सीओईपी हॉस्टेल आणि पूल गेट येथील महात्मा गांधी स्थानक येथे अशा प्रकारचे नकाशे लावण्यात आले आहेत.
एखाद्या दूर अंतरावर जाण्यासाठी कोणत्या ठिकाणी बस बदलावी लागेल, याची प्रवाशांना माहिती नसल्यामुळे अनेकदा प्रवाशांची अडचण होते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे नकाशे बनविण्यात आले आहेत.

असे असतील नकाशे
बस स्थानकावरून जाणार्‍या बसची माहिती असणारा ‘रूट मॅप’
पूर्ण शहराची माहिती देणारा ‘सिटी मॅप’
जवळचा परिसर व इतर पीएमपी स्थानकांची माहिती देणारा ‘इंटरचेंज मॅप’

Back to top button