पुणे : विदेशी गाड्यांच्या प्रेमात पुणेकर! | पुढारी

पुणे : विदेशी गाड्यांच्या प्रेमात पुणेकर!

प्रसाद जगताप

पुणे : फेरारी, लॅम्बोर्गिनी, मिनी कुप्पर, जॅग्वार यांसारख्या चारचाकी, तर अमेरिका, ट्रिम्फ, डुकाटी मॉन्स्टर, स्क्रॅम्बलरसारख्या दुचाकींच्या प्रेमात श्रीमंत पुणेकर पडले आहेत. महागड्या व आलिशान 305 विदेशी गाड्यांसाठी कोट्यवधींची रक्कम मोजत ‘आम्हीही कमी नाही,’ हे पुणेकरांनी आर्थिक राजधानी मुंबईला दाखवून दिले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे एप्रिल 2021 ते जून 2022 या वर्षभराच्या कालावधीत पुणे शहरात 305 विदेशी गाड्यांची खरेदी केल्याची नोंद करण्यात आली आहे.

यात 154 विदेशी चारचाकी आणि 151 विदेशी दुचाकींचा समावेश आहे. कोरोना काळात दोन वर्षे नागरिकांची आर्थिक आवक थांबली होती. कोरोनाचा कहर कमी झाल्यावर शासनाकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नागरिकांची आर्थिक गाडी हळूहळू रूळावर येऊ लागली. गाडी रुळावर येताच पुणेकरांनी वर्षभरातच कोट्यवधी किमतीच्या महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. या गाड्या इलेक्ट्रिक, सीएनजी, पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनावर धावणार्‍या आहेत.

ई-वाहनांच्या खरेदीत वाढ
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे वाहन खरेदीची नोंद करण्यात येते. या नोंदीमध्ये डिझेल, पेट्रोल, सीएनजीवर चालणार्‍या वाहनांची संख्या नेहमीच जास्त असते. यंदा मात्र गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत ई-वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पर्यावरणपूरक ई-वाहनांबद्दल जनजागृती होत असून, नागरिक ई-वाहने खरेदी करण्यावर भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या कंपन्यांकडून झाली विक्री
ट्रिम्फ मोटारसायकल, डुकाटी, इंडिया कावासकी, बीएमडब्ल्यू, हार्ली डेव्हिडसन, रॉवेट मोबिलिटी, झेजिंग लुयुन, जग्वार, पोर्श जर्मनी, ऑटोमोबाईल लॅम्बोर्गिनी, फेरारी स्पा, बीएमडब्ल्यू, टोयोटा किर्लोस्कर मोटार, व्होक्सवॅगन यांसारख्या विविध कंपन्यांच्या विदेशी गाड्यांची विक्री पुण्यामध्ये झाली आहे.

पुण्यात धावतेय फेरारी
पुणे शहरात यंदा 305 विदेशी गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. त्यात विविध प्रकारच्या विदेशी चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. तसेच, पुणे शहरात एप्रिल 2021 ते जून 2022 या कालावधीमध्ये सुमारे 5 कोटी रुपये किमतीची फेरारी गाडीचीदेखील खरेदी करण्यात आली.

Back to top button