पुणे : संततधारेमुळे खडकवासला साखळीत समाधानकारक साठा | पुढारी

पुणे : संततधारेमुळे खडकवासला साखळीत समाधानकारक साठा

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणक्षेत्रात संततधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीत समाधानकारक साठा झाला आहे. शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजता साखळीत 15.94 टीएमसी म्हणजे 54.69 टक्के पाणी साठा झाला होता. खडकवासला धरण चार दिवसांपासून 100 टक्के भरून वाहत आहे. पुणे शहराला दोन महिने पुरेल इतके 2.26 टीएमसी जादा पाणी खडकवासलातून मुठा नदीत सोडले आहे. अद्यापही खडकवासलातून विसर्ग सुरू आहे. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला होत आहे. चार-पाच दिवस जोरदार पाऊस पडल्यास वरील तिन्ही धरणे 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.

असे असले तरी सध्या गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत जवळपास दुप्पट पाणी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 15 जुलै 2021 रोजी साखळीत 9.36 टीएमसी म्हणजे 32.12 टक्के साठा होता. सिंहगड खडकवासला भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पानशेत खोर्‍यात संततधार सुरू आहे. दिवसभरात खडकवासला येथे 6, टेमघर येथे 40, पानशेत येथे 30 व वरसगाव येथे 28 मिलीमीटर पाऊस पडला. पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात सायंकाळी सहा वाजेनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. सर्व धरणात पाण्याची आवक सकाळच्या तुलनेत वाढली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत 4708 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

धरण पाणीसाठा (टक्केवारी)
खडकवासला 100
वरसगाव 51.76
पानशेत 55.08
टेमघर 40.45

Back to top button