वारज्यात डीपीची केबल जळाली | पुढारी

वारज्यात डीपीची केबल जळाली

वारजे : वारजे माळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या डीपी बॉक्सची भूमिगत असलेली केबल भरपावसात जमिनीमध्ये अचानक पेट घेऊन जळाल्याची घटना माळवाडी येथे घडली. स्थानिक मनसे कार्यकर्ते नाना सोनवणे व प्रवीण सोनवणे आणि महावितरणच्या तत्परतेमुळे होणारी दुर्घटना टळली.

याबाबत माहिती अशी की, माळवाडी येथील त्रिमूर्ती सोसायटीमधील वाहतूक वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यालगत महावितरणचा विद्युत प्रवाह पुरविणारा डीपी बॉक्स असून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डीपी बॉक्समधून आलेली विद्युतप्रवाहाची भूमिगत मोठी केबल भरपावसामध्ये अचानक पेट घेऊन जमिनीमध्ये जळू लागली. त्यामधून मोठा धूर निघू लागला.

दरम्यान, येथे वास्तव्यास असलेले मनसेचे पदाधिकारी नाना सोनवणे यांच्या निदर्शनास ही घटना आल्याने त्यांनी तातडीने पादचारी नागरिकांना रोखले. त्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधून घटना कळविली. घटनास्थळी दाखल झालेले महावितरणचे राहुल सोनटक्के, भगवान उभे, नानाभाऊ घाडगे यांनी विद्युतप्रवाह तात्पुरता बंद केला.

Back to top button