पुणे : उघडीप मिळताच खड्डे बुजविण्याचे काम सुरू | पुढारी

पुणे : उघडीप मिळताच खड्डे बुजविण्याचे काम सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मागील दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी दिवसभर थोडीसी उघडीप दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. दिवसभरात 139 खड्डे बुजविल्याची माहिती पथ विभागाचेप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.शहर व परिसरात मागील दाहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिमेंट काँक्रिटचे रस्ते वगळता बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. समान पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज लाइनच्या कामासाठी खोदलेले डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटने बुजविण्यात आले. डांबरी रस्ते व काँक्रिटचे पॅचवर्क ज्याठिकाणी आहे तेथे खड्डे पडले आहेत.

याशिवाय सिग्नल सिंक्रोनायजेशनसाठी चौकांमध्ये खोदाई करण्यात आली आहे. तेथे बसविलेले ब्लॉक्स व डांबरी रस्ता एकरूप न झाल्याने खड्डे पडले आहेत. शहरातील काही रस्त्यांची कामे अगदी पावसाळ्यापूर्वी करण्यात आली आहेत. या रस्त्यांवरील ड्रेनेज लाइन्सची झाकणे वर उचलली नाहीत. याठिकाणीही वाहनांमुळे झाकणांच्या कडेचा भाग खचून खड्डे तयार झाले आहेत. या खड्डयांमधून वाट काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली होती.

मात्र, गुरुवारी पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर महापालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली. दिवसभरात शहरात 139 खड्डे बुजविण्यात आले, तसेच 18 चेंबरची दुरुस्ती करून पाणी साठण्याची 14 ठिकाणे दुरुस्त केल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स, मुरूम आदींचा वापर केला जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी दिवसाला 400 पिशव्या कोल्डमिक्स वापरल्या जात आहेत, अशीही माहिती कुलकर्णी यांनी दिली.

 

Back to top button