साथीच्या आजारांचा वाढतोय जोर | पुढारी

साथीच्या आजारांचा वाढतोय जोर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, उलट्या, जुलाब, प्लेटलेट्स कमी होणे, अशी लक्षणे जाणवत असल्याने शहर, तसेच उपनगरांतील दवाखान्यांत नेहमीपेक्षा तिपटीने गर्दी पाहायला मिळत आहे. डॉक्टरांची वेळ घेण्यासाठी रुग्णांचे दिवसभर फोन येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे प्रमाण दोन आठवड्यांपासून वाढत आहेत. पावसाळ्याला जोरदार सुरुवात झाल्याने जलजन्य, कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे.

दूषित अन्न आणि पाण्यातून आजारांचा प्रसार होत असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये आजारांची लक्षणे पाहायला मिळत आहेत.  बरेचदा दुखणे अंगावर काढल्याने अथवा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने त्रास वाढत जातो. तब्येतीचा कोणताही त्रास होत असल्यास घरात उपलब्ध असलेली किंवा मेडिकल स्टोअरमधून आणलेली औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. प्रत्येकाच्या लक्षणांची तीव्र ता, त्रासाचा प्रकार, प्रतिकारशक्ती यामध्ये फरक असतो. एकाच प्रकारचे औषध सर्वांनाच उपयोगी पडू शकत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेतल्यास आजारातून लवकर बाहेर पडता येते. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

काय दिसत आहेत लक्षणे?
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा,अशक्तपणा, उलट्या, जुलाब

प्लेटलेट्स कमी होणे
पोट बिघडणे, भूक न लागणे, दम लागणे

कोणत्या आजारांची साथ?
कोरोना, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, चिकुनगुनिया, डायरिया

काय काळजी घ्यावी?
पाणी उकळून प्यावे
पावसात भिजणे टाळावे
दूषित अन्न आणि पाण्याचे सेवन करू नये
घरात आणि भोवतालच्या परिसरात स्वच्छता राखावी
ताजे अन्न, फळे, भाज्या खाव्यात
आजारपणात पुरेशी विश्रांती

ताप, सर्दी, खोकला, अशक्तपणा अथवा तत्सम लक्षणे दिसत असल्यास सुरुवातीला तीन दिवसांचा गोळ्यांचा डोस दिला जातो. तीन-पाच दिवसांमध्ये फरक दिसत नसल्यास रक्ताच्या, युरिनच्या काही चाचण्या करून घेतल्या जातात. त्यामधून आजाराचे नेमके निदान होते आणि उपचारांची दिशा ठरवता येते. पावसाने जोर धरला असल्याने गेल्या तीन-चार दिवसांत दवाखान्यात येणार्‍या रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे.

                                                       – डॉ. अशोक साबणे, जनरल फिजिशियन

Back to top button