राज्यातील साथरोगांची माहिती आता एका क्लिकवर; प्रत्येकाचे हेल्थ रेकॉर्ड | पुढारी

राज्यातील साथरोगांची माहिती आता एका क्लिकवर; प्रत्येकाचे हेल्थ रेकॉर्ड

प्रज्ञा केळकर-सिंग, पुणे : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील साथरोगांची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. साथीचे रोग आणि विविध स्वरूपाचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म’ हे ऑनलाइन व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. यात 33 हून अधिक आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यानिमित्ताने राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे ‘इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ तयार होत आहे.

पूर्वीपासून कार्यरत असलेल्या ‘इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हिलन्स प्रोजेक्ट’ अर्थात ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा’च्या धर्तीवर वर्षभरापासून हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. कागदोपत्री करावे लागणारे सोपस्कार कमी व्हावेत, या उद्देशाने हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून, प्रयोगशाळांमधून साथरोगांच्या संदर्भातील माहिती भरली जाऊ शकते. त्याची माहिती तातडीने जिल्हा आणि राज्यस्तरावर मिळू शकेल.सुरुवातीच्या टप्प्यात कीटकजन्य, जलजन्य आजारांची नोंद ठेवली जात आहे.

पुढील टप्प्यात असंसर्गजन्य रोगांच्या नोंदींसह लसीकरण, कुटुंब नियोजन असे विषयही यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. आरोग्याशी संबंधित सर्व विषय एका छताखाली आणण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मानस आहे. यामध्ये 33 हून अधिक आजारांचे सर्वेक्षण केले जात आहे. जीआयएस अर्थात मॅपिंगच्या साहाय्याने अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ‘रिअल टाईम डेटा’ मिळणे शक्य झाले आहे. प्रकल्पातील यशस्वी वाटचालीबद्दल जूनच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचा गौरव करण्यात आल्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

ही आहेत वैशिष्ट्ये…
आरोग्यसेवकांसाठी ‘एस फॉर्म’
डॉक्टरांसाठी ‘टी फॉर्म’
प्रयोगशाळांसाठी ‘एल फॉर्म’
राज्यातील प्रत्येक रुग्णाचे तयार होतेय इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड
नाव आणि इतर तपशिलासह होते नोंद
विशिष्ट आजाराच्या केसेस विशिष्ट ठिकाणी वाढल्यास अधिकार्‍यांच्या मोबाईलवर अलर्ट

‘इंटिग्र्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म’ हा प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वी होत असल्याने इतर राज्यांमध्येही डॉ. प्रदीप आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी होत आहे.

                                                 – डॉ. स्वप्निल लाळे, सहसंचालक आरोग्यसेवा

Back to top button