रेल्वेची यंत्रणा अखेर ‘हलली’; हडपसर टर्मिनलवर आता सुसज्ज वेटिंग रूम अन् स्वच्छतागृह | पुढारी

रेल्वेची यंत्रणा अखेर ‘हलली’; हडपसर टर्मिनलवर आता सुसज्ज वेटिंग रूम अन् स्वच्छतागृह

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेल्वेच्या हडपसर टर्मिनलवर आता प्रवाशांसाठी सुसज्ज वेटिंग रूमसह स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनलवर होणारी रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. हडपसर रेल्वे टर्मिनलवरच्या सद्यस्थितीचा आढावा सांगणारे आणि हडपसर रेल्वे टर्मिनल की गावाकडचं स्थानक? असे सचित्र मथळा असलेले वृत्त दै.‘पुढारी’त नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले होते.

त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी मंगळवारी (13 जुलै) हडपसर टर्मिनलची पाहणी केली. यावेळी येथे प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्यात काय आवश्यक आहे आणि तातडीने कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, याची अधिकार्‍यांनी पाहणी केली. रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, बी. के.सिंह, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, परिचालन प्रबंधक स्वप्नील निला, मिलिंद वाघोलीकर यांच्यासह निर्माण संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

टर्मिनलवर अनाउन्समेंट सुविधा
टर्मिनलवर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या पाहणी दौर्‍यादरम्यान येथे सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, रेल्वे स्थानकावर ये-जा करणार्‍या गाड्यांची प्रवाशांना माहिती देण्यासाठी अनाउन्समेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे.

कव्हर शेड टाकणार
ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांचे हडपसर टर्मिनल येथे संरक्षण व्हावे, यासाठी येथे पहिल्या टप्प्यात ‘कव्हर शेड’ उभारण्याचे रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाप्रमाणे दिसणार्‍या या स्थानकाला टर्मिनलचे स्वरूप प्राप्त होणार आहे. आगामी काळात या स्थानकावरून आणखी गाड्या सोडण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

नजीकची रेल्वे कार्यालये हटविणार
हडपसर रेल्वे टर्मिनल येथे लगतच असलेली रेल्वे कार्यालये, रेल्वे कॉलनी, आरपीएफचे कार्यालय हटविण्यात येणार आहे. ही जागा रिकामी करून येथे रेल्वे गाड्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनलच्या जागेत आता वाढ होणार आहे.

प्लॅटफॉर्म 1 वर स्वच्छतागृह
हडपसर टर्मिनल येथे प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे येथे येणार्‍या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

Back to top button