Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; कुकी दहशतवाद्यांचा हल्ला; दोन जवान शहीद | पुढारी

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; कुकी दहशतवाद्यांचा हल्ला; दोन जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील नरसेना भागात शुक्रवारी मध्यरात्री कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले. यासंदर्भात मणिपूर पोलिसांनी माहिती दिली आहे. हे जवान बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “दहशतवाद्यांनी छावणीला लक्ष्य करत डोंगरमाथ्यावरुन अंदाधुंद गोळीबार केला. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सुरू झाला आणि सुमारे २.१५ वाजेपर्यंत सुरू होता. अतिरेक्यांनी बॉम्ब फेकले, त्यापैकी एक सीआरपीएफ (CRPF) च्या १२८ बटालियनच्या चौकीत स्फोट झाला.”

कुकी आणि मीतेई समुदायांमध्ये आरक्षणावरून हिंसाचार

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. ‘आउटर मणिपूर’ जागेसाठी ७६.०६ टक्के मतदान झाले. येथे माओ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८९.८४ टक्के मतदान झाले आहे. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित अतिरेक्यांनी धमकावल्यानंतरही लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. मणिपूरच्या अंतर्गत भागात बिष्णुपूर येते. या भागात १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. मतदानादरम्यानही येथे हिंसाचार झाला होता. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी ३ मेपासून आरक्षणावरून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे.

मणिपूर हिंसाचारात शेकडो लोकांचा बळी

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात जवळपास २०० लोकांचा बळी गेला आहे. कुकी समुदायाने मैतेई समुदायाला दिलेल्या आरक्षणाला विरोध केला. यानंतर मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. त्यानंतर राज्यात वेळोवेळी हिंसाचार आणि संघर्ष झाला. काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हेही वाचा : 

Back to top button