पिंपरी : मतदार यादी फोडताना राजकीय हस्तक्षेप, मडिगेरी यांचा आरोप | पुढारी

पिंपरी : मतदार यादी फोडताना राजकीय हस्तक्षेप, मडिगेरी यांचा आरोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय मतदार यादी फोडून ती प्रसिद्ध केली आहे. हेतूपुरस्पर, राजकीय दबावाखाली गवळीमाथा, बालाजीनगर, एमआयडीसी प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपेक्षित असणारे 6 ते 7 हजार नावे कमी करून इंद्रायणीनगर, लांडेवाडी, गव्हाणे वस्ती प्रभाग क्रमांक 10 व बोर्हाडेवाडी, जाधववाडी प्रभाग क्रमांक 3 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केला आहे. त्याप्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

मडिगेरी यांनी या संदर्भात भारत निवडणूक आयोग, राज्यपाल, पुणे विभागीय कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याकडे ही तक्रार केली आहे. या तक्रारीवर उचित कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेस दिले आहेत. मडिगेरी यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादीतील 556 मतदारांपैकी 363 नावे अन्य प्रभागात टाकल्याचे स्पष्ट झाले. मतदार याद्यामध्ये 6 ते 8 हजारहून अधिक मतदारांचे नावे राजकीय दबावापोटी, राजकीय हस्तक्षेप होऊन मतदार याद्यांमध्ये फेरफार करून टाकण्यात आली आहे.

प्रभाग 11 मधील सेक्टर 3, 4 ,6, 7, 9, 10, 11 व 13, तसेच जय गणेश साम्राज्य, नारायण सोसायटी, प्रिन्सेस व्हिला सोसायटी, पांजरपोळसमोरील गुरुविहार कॉलनी, लांडगेनगर व अन्य ठिकाणच्या हजारो मतदारांचे नावे प्रभाग 3, 4, 9, 10, 12, 16 मध्ये टाकण्यात आली आहेत. त्यावर 3 जुलैला पुराव्यानिशी 700 पानांची हरकत नोंदविली. मतदार याद्या फोडताना निवडणूक यंत्रणेचे चुकीचे कामकाज केले. वारंवार चुका निदर्शनास आणून दिले पण प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. नियमानुसार निवडणुकीचे कामकाज करावे. अन्यथा कायदेशीर लढा द्यावा लागेल, असा इशारा मडिगेरी यांनी दिला आहे. दरम्यान, प्रभागरचनेच्या विरोधातील त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Back to top button