वारवंड रस्त्यावर दरड कोसळली | पुढारी

वारवंड रस्त्यावर दरड कोसळली

भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर-महाड मार्गावरील हिर्डोशी भागातील वारवंड गावात जाणार्‍या महाड रोडवरील फाट्यावर दरड कोसळली. ही घटना रविवारी (दि. 10) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. हिरडस मावळात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरून जमीन भुसभुशीत होऊन दरडी पडत आहेत. सकाळी भोर-महाड मार्गावर वारवंड गावात जाणार्‍या मेन रोडच्या फाट्यावर दरडीबरोबर मोठा दगड पडला. त्यामुळे गावात जाणारा मार्ग काही काळ बंद झाला होता. बांधकाम विभागाने पडलेल्या दगडी व दरड काढून गावात जाणारा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी वारवंडचे सरपंच लक्ष्मण दिघे, उपसरपंच संतोष दिघे, शिवाजी दिघे, शंकर मोरे यांनी केली आहे.

सतर्क राहावे
भोर-महाड मार्ग, दारमंडप साळुंगण तसेच निरा-देवघर धरण रिंग रोड भागात सतत जोरदार पाऊस पडत असून, स्थानिक नागरिकांनी सतर्क राहावे तसेच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास प्रशासनाला कळविण्याचे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

Back to top button