खेड तालुक्यात दमदार पाऊस | पुढारी

खेड तालुक्यात दमदार पाऊस

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यात गेले दोन दिवस मान्सूनने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या सर्व भागांत शनिवारी (दि. 9) दिवसभर जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा अंदाज दिल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले आहे. सतर्कता म्हणून तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सावधानतेचा इशारा दिला आहे. सर्व यत्रंणासह आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज ठेवण्यात आली आहे. पर्यटक, ट्रेकर, निसर्गप्रेमींनी जंगलात, धबधबे, नदीपात्रात, ओढ्यात जाण्याचे टाळावे.

तसेच धोकादायक ठिकाणावरून सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. नागरिकांनी या काळात कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. झाडांखाली थांबण्याचे टाळावे, असे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले आहे. भीमाशंकर खोर्‍यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. नदी, नाल्यांच्या पाणी प्रवाहात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. चासकमान, कळमोडी आणि भामा आसखेड धरणाच्या जलाशयात वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणताही धोका, दुर्घटनेची शक्यता वाटल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस, तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 02135-222240 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके जोमाने वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील धरणे, जलाशय भरण्याची शक्यता आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे चित्र आहे.

 

 

Back to top button