मुळा-मुठा नदीकाठ सुधार व सुशोभीकरणचा मार्ग सुकर | पुढारी

मुळा-मुठा नदीकाठ सुधार व सुशोभीकरणचा मार्ग सुकर

हिरा सरवदे

पुणे : भाजपच्या महत्त्वाकांक्षी अशा मुळा-मुठा नदीकाठ सुधार व सुशोभीकरण (नदी पुनरुज्जीवन) प्रकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साशंकता व्यक्त केल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला काही अंशी खीळ बसली होती. मात्र, आता राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्याने या प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासंदर्भात माहिती मागविल्याने कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणार्‍या मुळा व मुठा नदींचे पुनरुज्जीवन करून सुशोभीकरण करण्याचे नियोजन महापालिकेतील सत्ताधारी भाजपने तीन वर्षापूर्वी केले होते. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा प्रकल्प भाजपसाठी महत्त्वाकांक्षी ठरला होता. मात्र, शहरातील पर्यावरणप्रेमींनी आणि अभ्यासकांनी या प्रकल्पामुळे नदीला पूर येऊ शकतो, नदी पात्रातील बांधकामामुळे आणि काँक्रीटमुळे पर्यावरणाला व जलचरांना हानी पोहोचू शकते, असा आक्षेप घेत विरोध केला होता.

भाजपने महापालिकेची मुदत संपत असतानाच आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरकून घेतले. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी राज्य शासनाकडे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे धाव घेत प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत पवार यांच्यासह स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेत एक समितीची नियुक्ती केली होती.

या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला एक प्रकारे खोडाच घातला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने उपस्थित केलेल्या शंकांचे अद्याप निरसन केलेले नाही, चर्चेलाही बोलावले नाही. त्यामुळे या प्रकल्पास कायमची स्थगिती द्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडेच केली होती. या सर्व घडामोडींमुळे प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय झाले होते.
(क्रमशः)

दक्षता घेण्याचे जलसंपदा विभागाचे पत्र
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प करताना नदीप्रवाहात कोणताही अडथळा येणार नाही, नदीची वहनक्षमता कमी होणार नाही व नदीच्या काटछेदात कोणताही बदल होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहे. या पत्रामध्ये जलसंपदाने प्रकल्पाचे काम थांबवावे, असे कोठेही म्हटलेले नाही. मात्र, पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे निराकरण होऊन, त्यानंतर काम सुरू करणे सयुक्तिक आहे, असेही पत्रात नमूद केले आहे. याशिवाय पुरासारखी घटना घडल्यास त्यास महापालिका जबाबदार असेल, असेही नमूद केले आहे.

नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण प्रकल्पाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. पावसाळ्यामध्ये नदी पात्राबाहेरील कामे करण्यात येणार आहेत. पावसाळ्यामध्ये ड्रॉइंगची कामे करण्यावर भर दिला जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेतली असून, प्रकल्पाची माहिती संकलित करण्याचेही आदेश दिले आहे.

                                         – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Back to top button