मोरगाव- निरा रस्ता अपघातप्रवण | पुढारी

मोरगाव- निरा रस्ता अपघातप्रवण

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा:  मोरगाव ते निरा हा प्रमुख जिल्हा मार्ग असून सतत अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. मार्ग उत्तर व दक्षिणेत जाण्यासाठी अवजड वाहनांना अत्यंत जवळचा आहे. मात्र, सध्या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाल्याने प्रवाशांची तसेच वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. मोरगाव ते निरा मार्गाने इंधन बचत, वेळ बचत होते. मार्गाचे तीन टप्पे असून या टप्प्यांसाठी पंचेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. परंतु मधल्या टप्प्याचे रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने चालल्याने मार्ग जवळचा असूनही मोरगाव, पळशी किंवा जेजुरी मार्गे सातारा येथे जाण्यासाठी वाहनचालकांना क्रमप्राप्त ठरते.

या मार्गाबाबत दैनिक पुढारीने अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध करूनही या मधल्या टप्प्याचे दुरुस्तीकरण पूर्णत्वास आले नाही. दुरुस्ती करणार्‍या अधिका-यांना व ठेकेदाराला वारंवार तोंडी, लेखी निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र, तरीही या कामाची गती अत्यंत मंद आहे. याच मार्गावर चौधरवाडीजवळ रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे काळजी न घेतल्यामुळे दुचाकी चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्धिमाध्यमांनीही वारंवार रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वृतांकन केले आहे. मात्र काम युद्धपातळीवर करण्याऐवजी वेळकाढूपणा केला जात आहे. परिणामी हा रस्ता अपघातप्रवण झाला आहे.

चौधरवाडी तीव्र घाट उतारावर अनेकवेळा वाहनांची घसरण होऊन अपघात झाले आहेत. वाहनांतील मालाचे व चालकांनाही जीव गमवावा लागला आहे. तरीही या तीव्र घाट -उताराची रुंदी वाढवण्यासाठी वनविभागाकडे किंवा तत्सम विभागकडे सांगणे आवश्यक आहे. रस्ता निर्धोक करण्यासाठी संबंधित प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशी वाहनचालक, पालक, ग्रामस्थ, नागरिकांची मागणी आहे.

Back to top button