तीन दिवसांत महिन्याचे पाणी ; धरणसाखळीत 14 टक्के साठा | पुढारी

तीन दिवसांत महिन्याचे पाणी ; धरणसाखळीत 14 टक्के साठा

पुणे/ खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बुधवारीदेखील कायम होता. पुणेकर पाणीकपातीला तोंड देत असताना, शहराला जवळपास महिनाभर पुरेल इतके पाणी गेल्या तीन दिवसांत धरणांत जमा झाले. धरणसाखळीत एकूण 4.08 टीएमसी (14.01 टक्के) पाणीसाठा बुधवारी सायंकाळी पाच वाजता होता. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये 4.08 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 14.01 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये 8.67 टीएमसी म्हणजेच 29.76 टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये 4.59 टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आज सलग तिसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत. तेथील जनजीवन ठप्प झाले. खडकवासला धरणसाखळीतील साठ्यात तीन दिवसांत दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाढले. दिवसभरात सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत टेमघर येथे 30, वरसगाव येथे 53, पानशेत येथे 52 व खडकवासला येथे 11 मिलीमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणाच्या वरील बाजूला तीन धरणांच्या पुढे मोठे पाणलोट क्षेत्र आहे. खडकवासल्यामध्ये सहा दिवसांत दुप्पट साठा झाला आहे. पानशेत व वरसगाव धरणातून सोडलेले पाणी व ओढ्यातील पाण्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढला.

जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे पानशेत, वरसगावच्या डोंगरी पट्ट्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. दासवे येथील शेतकरी किरण मरगळे म्हणाले, ‘शेतीची कामे बंद आहेत. ओढ्यांना पूर आले आहेत. त्यामुळे जनावरेही चारण्यासाठी रानात सोडली नाही.

एकूण पाणीसाठा (टक्के)-29.76

पाणीसाठा
टीएमसी-8.68

 

Back to top button