सहा दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला | पुढारी

सहा दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला

पुणे : पुढारी वृत्तसेवा; ‘मान्सूनने सहा दिवसआधीच म्हणजे शनिवारी (दि. 2) संपूर्ण देश व्यापला आहे. वास्तविक, सरासरी तारखेनुसार मान्सून 8 जुलैच्या आसपास देश व्यापत असतो,’ अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. उत्तर भारतातील राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ दिली. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दक्षिण गुजरात ते उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे.

या क्षेत्राची तीव्रता कायम आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश भागांत अतिवृष्टी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातसुध्दा काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यलो अलर्ट
पालघर, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंदपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

Back to top button