अभ्यासक्रम आता आनंददायी; आठवीपर्यंतच्या शिक्षणात आनंद देणार्‍या उपक्रमांचा समावेश | पुढारी

अभ्यासक्रम आता आनंददायी; आठवीपर्यंतच्या शिक्षणात आनंद देणार्‍या उपक्रमांचा समावेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा; शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना आनंद देणार्‍या वेगवेगळ्या उपक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. गोष्ट, छोटे खेळ, अनुभवकथन, श्वासांवरील क्रिया, मुक्त हालचाली, चालण्याची पद्धत, प्रसंगनाट्य, गाणी, कवितांचे सादरीकरण, अवांतर वाचन अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शाळांमध्ये आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी हा उपक्रम भोर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. त्यानंतर आता संपूर्ण राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून, सजगता, गोष्ट, कृती आणि अभिव्यक्ती अशा चार प्रकारांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सोमवार ते शनिवार या सहा दिवसांत कोणते उपक्रम घ्यावेत, याबाबतही शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. कोणत्या दिवशी काय उपक्रम घ्यायचा, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आनंद घेऊन शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागचा उद्देश असणार आहे. शाळा सुरू होताना परिपाठानंतर विद्यार्थ्यांनी जर वेगवेगळ्या उपक्रमांमधून आनंद घेत माहितीचे ग्रहण केले, तर शिकण्यासाठी अधिक उत्तम वातावरण तयार होईल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

परिपाठ झाल्यावर पहिली 35 मिनिटे
आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शाळांना परिपाठ झाल्यानंतर पहिल्या तासातील 35 मिनिटांमध्ये करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक दिवशी ठरलेल्या नियोजनानुसार परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकी शिक्षण सुरू करण्याआधी आनंददायी अभ्यासक्रमाचा आस्वाद घेतील. अभ्यासक्रमाच्या नियोजनाप्रमाणे उपक्रम पार पाडावेत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

असे असेल अभ्यासक्रमाचे नियोजन
सोमवार – सजगता
मंगळवार, बुधवार – गोष्टी सांगणे
गुरुवार, शुक्रवार – कृती
शनिवार – अभिव्यक्ती
आनंददायी अभ्यासक्रमाचा उद्देश
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे
विद्यार्थ्यांत सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
शाळेत विद्यार्थ्यांचा ताण कमी करणे
संभाषण कौशल्य विकसित करणे
शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून तयार करून घेणे.

Back to top button