भोर – महाड महामार्ग तीन महिने अवजड वाहतुकीस बंद | पुढारी

भोर - महाड महामार्ग तीन महिने अवजड वाहतुकीस बंद

भोर : पुढारी वृत्तसेवा: रायगड जिल्हा प्रशासन विभागाने भोर – महाड महामार्ग अवजड वाहतुकीसाठी तीन महिने बंद केला आहे. याबाबतची सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढली आहे. भोर – महाड हा रस्ता कोकण भागाला जोडला असल्यामुळे अवजड वाहतुकीमध्ये दळणवळण साधनाने ने – आण करण्यासाठी व्यापार्‍याना सोईस्कर आहे. मात्र, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हा रस्ता खराब झाला. तो वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहतूक 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवणेचा निर्णय महाड प्रशासनाने घेतला आहे.

पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगाव-निजामपूर ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट, तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर, खंड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा पर्यायी रस्त्याचा उपयोग करावा, असे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड यांनी कळविले आहे. भोरवरून महाड हद्दीपर्यंत रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे झाले असून त्याची पाहणी शुक्रवार (दि. 1) रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय वागज, सहाय्यक अभियंता योगेश मेटेकर, सदानंद हल्लाळे यांनी केली. धोकादायक ठिकाणी बॅरिकेड, सूचनाफलक, श्री वाघजाई येथील हॉटेल व्यावसायिकांनी टपर्‍या काढून घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

भोर – महाड रस्त्यावर पाऊस सुरू होण्याअगोदर दरड कोसळल्याने एक जण जखमी झाला आहे. घाटमार्ग पावसाळ्यात बंद ठेवावा, असा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे. तसेच मंगळवारी (दि. 5) रायगड जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे आपत्ती व्यवस्थापन, भोर, महाड, मावळ प्रशासनाच्या वतीने बैठक घेण्यात येणार आहे.

                                                      -राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी भोर

Back to top button