शहरी-गरीब योजनेच्या सर्व प्रक्रिया संगणकीकृत! | पुढारी

शहरी-गरीब योजनेच्या सर्व प्रक्रिया संगणकीकृत!

पुणे: पुढारी वृत्तसेवा: शहरी-गरीब योजनेच्या लाभासंदर्भात स्पष्टता नसल्याने कार्डधारकांकडून मर्यादेपेक्षा जास्त लाभ घेतला जातो. दिली जाणारी बिले आणि खर्चामध्ये ताळमेळ नाही, असे वृत्त दैनिक पुढारीने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एकाच कुटुंबात एकपेक्षा अधिक कार्ड आहेत का, याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शहरातील गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता यावेत यासाठी महापालिकेने शहरी गरीब योजना सुरू केली.

महापालिका हद्दीतील वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असलेल्यांसाठी ही योजना आहे. योजनेचे कार्ड असणार्‍यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खर्चाच्या 50 टक्के रक्कम मिळते. मदतीच्या रकमेची मर्यादा एक लाखापर्यंत आहे. कॅन्सर आणि डायलेसिस उपचारासाठी दोन लाखांपर्यंत मदत मिळते. मात्र, औषधांसाठी किती रक्कम आणि रुग्णालयात उपचार घेण्यासाठी किती रक्कम याबाबत स्पष्ट नसल्याने मर्यादेपेक्षा जास्त फायदा घेतला जातो.

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळणार कार्ड
शहरी गरीब योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील नागरिकांना महापालिका भवनात येऊन कागदपत्रे जमा करून कार्ड घ्यावे लागते. नागरिकांचा वेळ वाचावा तसेच एकाच ठिकाणी कर्मचार्‍यांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी योजनेचे कार्ड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात प्रस्ताव महापालिका भवनातच स्वीकारले जातील, असे आरोग्य अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

मर्यादेपेक्षा अधिक लाभ घेण्याचे प्रकार घडत आहेत का याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच एका कुटुंबास एकच कार्ड मिळत असताना कोणी एकापेक्षा अधिक कार्ड काढली आहेत का याची तपासणी केली जाणार आहे. तसेच योजनेची सर्व प्रक्रिया संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल. तसेच या संदर्भात अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे.

                     – डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, महापालिका.

 

Back to top button