मावळ : पावसाअभावी भातलावणी रखडली | पुढारी

मावळ : पावसाअभावी भातलावणी रखडली

येळसे : पुढारी वृत्तसेवा : पावसाचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी भात पेरणी केली होती. ही रोपे तरारली असून, मोठ्या पावसाअभावी भात लावणी रखडली आहे.
मावळातील काही शेतकर्‍यांनी सिंचनाच्या पाण्यावरती भात पेरणी केली होती.

यंदा मान्सून लवकर दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र तो अंदाज खोटा ठरवत काही भागात पाउस बरसलाच नाही. राज्याच्या काही भागात जरी पाऊस जोरदार पडत असेल तरी मावळ तालुक्यात अजून पुरेसा पाऊस पडलेला नाही. ज्या शेतकर्‍यांनी सिंचनाच्या पाण्यावरती भात पेरणी केली होती. ती रोपे आता लावण्या जोगी झाली असून भात लावणी साठी पाणी नसल्यामुळे भात लावणी रखडली आहे.

शेतांमध्ये पाणीच नसल्याने भात रोपांची खणणी, चिखलणी, लावणी ही कामे रखडली आहे. ज्या शेतकर्यांनकडे सिचंनाची सोय उपलब्ध आहे अशा शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसुन येत आहे मात्र गेल्या काही दिवसापासुन पाऊस गायब झाल्याने व कडक ऊन पडत असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र मंगळवार (दि.28 ) रोजी सकाळ पासून पवनमावळ परीसरात रिमझिम पाऊस सुरू होता. या पाउसामुळे पाण्या आभावी भात रोपे करपू लागली होती त्या रोपांना जीवनदान मिळाले आहे. 1 जून पासून पवनाधरण परिसरात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आज दिवसभरात 7 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

आम्ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये सिंचनाच्या पाण्यावर भात पेरणी केली होती. ती भात रोपे आता लावणीसाठी तयार झाली असून आम्ही आता समाधानकारक पावसाच्या प्रतिक्षेत आहे. रिमझिम पाऊस पडत आहे. – रमेश आडकर (शेतकरी)

Back to top button