सांगवी-वाघवस्ती रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य | पुढारी

सांगवी-वाघवस्ती रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

सांगवी : पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील सांगवी ते वाघवस्ती रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर थोडा जरी पाऊस झाला, तरी चिखलाचा राडारोडा होत आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधितांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी होत आहे. सांगवी-वाघवस्ती रस्त्यावरून अहिल्यानगर, एजगरवस्ती, ननवरे-कदमवस्ती, तावरेवस्ती, निकमवस्ती, भापकर-शिंदेवस्ती व वाघवस्ती भागांतील नागरिकांना ये-जा करावी लागते. रस्त्याच्या कडेने भूमिगत गटारीचे काम चालू आहे. गटाराचे पाइप टाकताना खोदकाम केल्याने परिसरात चिखल होतो आहे.

अगोदरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे आणि रविवारी (दि. 26) दुपारी पाऊस झाल्याने चिखलाचा राडारोडा चुकवताना लहान वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. यापूर्वी काहीवेळा चिखलावरून घसरून लहान-मोठे अपघात झाले. रस्त्यावर ऊस व दूध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. मात्र, चिखलामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मागील काही काळात सांगवीतील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. बहुतांश पदाधिकार्‍यांनी राहत्या घरासह शेतबांधापर्यंत रस्ताकामे करून घेतली आहेत.

मात्र, सांगवी-वाघवस्ती रस्त्यावरून दररोज किमान हजार नागरिकांची ये-जा असतानाही कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. सांगवी-वाघवस्ती रस्ताकामासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर पावसाळ्यानंतर काम सुरू होणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले. पदाधिकार्‍यांचे ढोलके! बारामती तालुक्यात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, ज्या भागात खरेच रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी काम होणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. काही गावांमध्ये मीच कसा निधी आणला, विकासकामे कशी केली, हे दाखविण्यासाठी पदाधिकारी नातेवाईक, मित्रमंडळींना शेतापर्यंत नेऊन ढोलके वाजवून सांगत सुटले आहेत.

हेही वाचा

औरंगाबाद : आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला 30 लाखांचा निधी

पवार, फडणवीस यांच्या नवी दिल्लीत हालचाली

बेट भागात चोर्‍यांचा सपाटा; नागरिकांमध्ये घबराट

Back to top button