शिवसैनिकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’; शिरूर तालुक्यातील 39 गावांतील अवस्था | पुढारी

शिवसैनिकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’; शिरूर तालुक्यातील 39 गावांतील अवस्था

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील पाबळ, रांजणगाव व टाकळीहाजी जिल्हा परिषद गटातील 39 गावांचा समावेश शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे. येथील विधानसभेची पारंपरिक लढत ‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ अशीच असल्याने येथील शिवसैनिकांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे. राज्यामध्ये भाजपसोबत असलेली युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी युती केल्याने येथील शिवसैनिक व पदाधिकारी संभ्रमित झाले होते. मागील अडीच वर्षे फक्त बघ्याची भूमिका त्यांच्यात राहिली होती. परंतु, राष्ट्रवादीबाबत त्यांच्या मनात खदखद होती.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘शिवसैनिकांना सन्मानाने जगू द्या,’ असे केलेले वक्तव्य सर्व काही सांगून जात होते. शिवसंपर्क अभियानानिमित्त खासदार ओमराजे निंबाळकर शिरूर तालुक्याच्या दौर्‍यावर होते. या वेळी त्यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या वरवंट्याचा पाढा त्यांनी वाचला होता. निधी दिला जात नाही, गृह खात्याकडून त्रास दिला जातो, ही खंत शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. शिवसैनिकांच्या हाती केवळ ‘मुख्यमंत्री आमचा’ एवढाच मंत्र होता. 39 गावांत व शिरूर तालुक्यात शिवसेना व भाजपने अंतर्गत युती करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्यात, अशा प्रकारचा दबाव तयार झाला होता.

शिवसेना सत्तेत असूनदेखील शत्रूच्या तलवारीला धार लावण्याच्या कामाला लागल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. शिवसंपर्क अभियानादरम्यान जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी उसने अवसान आणण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले होते. परंतु, हे उसने अवसान कधीच गळून पडल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आलेली नाही. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात समाविष्ट झालेल्या 39 गावांत शिवसैनिकांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी परिस्थिती झाल्याची भावना आहे.

पक्षसंघटनेतील काही पदाधिकारी उध्दव ठाकरे यांचे समर्थक आहेत. परंतु, प्रत्यक्षात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याशी सहमत असल्याचे चित्र आहे. पक्षाचे पदाधिकारी नसलेल्या अनेकांच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकत आहे. मविआविरोधात त्यांचा कौल असून, शिंदे यांचे बंड फसले तर शिवसेना पदाधिकार्‍यांना बाजूला ठेवत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मोठ्या हालचाली शिरूर तालुक्यात होऊ शकतात.

Back to top button