आरपीएफ अधिकार्‍याने वाचवला ज्येष्ठाचा जीव | पुढारी

आरपीएफ अधिकार्‍याने वाचवला ज्येष्ठाचा जीव

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शिवाजीनगर रेल्वेस्थानक येथे चालत्या रेल्वेगाडीत चढत असताना एका ज्येष्ठाचा पाय घसरला अन् तो रेल्वेखाली गेला. फरपटत जात असतानाच क्षणाचाही वेळ न घालवता आरपीएफचे सबइन्स्पेक्टर रतन सिंह यांनी सतर्कता दाखवत तत्काळ धावून गेले अन् त्या ज्येष्ठाचा जीव वाचला. पालखीनिमित्त सांगलीहून पुण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक रविकांत ढोले (वय 60) पुन्हा रेल्वेने सांगलीकडे निघाले होते. त्या वेळी शिवाजीनगर रेल्वेस्टेशन येथे हा अपघात झाला. त्यावेळी आरपीएफचे अधिकारी रतन सिंह येथे नेमणुकीला होते. त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचला.

अशी घडली घटना…
ज्येष्ठ नागरिक ढोले हे पालखीसाठी सांगलीवरून पुण्यात आले होते. पालखी दर्शनानंतर ते शिवाजीनगर येथे लोकलची वाट पाहात बसले होते. पण दोन दिवसांपासून झोप पूर्ण न झाल्यामुळे शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट पाहात ते झोपी गेले. त्यांना जाग आली असता एक रेल्वे जात असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे घाईने ते रेल्वेकडे गेले. त्यांनी चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. त्याच गडबडीत त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वेगाडी व प्लॅटफार्मच्या मध्ये अडकले आणि फरपटत गेले. त्यावेळी रतनसिंह यांनी ढोले यांना वाचविले. जीव वाचविल्यामुळे ढोले यांनी रतनसिंह यांचे आभार मानले.

हेही वाचा

रस्ते बांधणार्‍यावर पुरातन मंदिरांच्या संवर्धनाची जबाबदारी

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

 

Back to top button