रस्ते बांधणार्‍यावर पुरातन मंदिरांच्या संवर्धनाची जबाबदारी | पुढारी

रस्ते बांधणार्‍यावर पुरातन मंदिरांच्या संवर्धनाची जबाबदारी

दिनेश गुप्ता

पुणे : कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर तसेच पुण्यातील एकवीरादेवीच्या मंदिरासह राज्यातील एकूण आठ पुरातन मंदिरांच्या संवर्धनाचे काम या कामातील तज्ज्ञ असलेल्या पुरातत्त्व खात्याकडून करवून घेण्याऐवजी ते चक्क रस्ते बांधण्याची जबाबदारी असलेल्या रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सोपवून त्यांना 101 कोटी रुपयांचा निधी प्राथमिक सर्वेक्षणासाठी देण्यात आला असून, आणखी निधी देण्यात येणार आहे.

रस्ते विकास महामंडळावर राज्य सरकारचे विशेष प्रेम असल्याचे या पूर्वीचे दाखले असतानाच आताही त्याच महामंडळावर मेहेरनजर दाखविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातन वास्तूंचे जतन करण्याच्या हेतूने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पुरातत्त्व विभागाकडे पुरेसा निधी नसल्याचे कारण पुढे करत या कामाची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली या वास्तूंच्या संवर्धनाचे काम होणार आहे. आतापर्यंत पुरातन वास्तूंचे संवर्धन व देखभाल दुरुस्ती या विभागाकडूनच करून घेतली जात होती.

नेहमीच चर्चेत राहणार्‍या या महामंडळाने कामाला सुरुवातही करून टाकली आहे. रस्ते विकास महामंडळाकडून केल्या जाणार्‍या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हाती घेण्यात आलेल्या एकूण आठ मंदिरांपैकी पाच मंदिरे भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात. पुरातत्त्व विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या समन्वयातून या मंदिरांचे संवर्धन व चांगले काम व्हावे यासाठी एक बैठक घेऊन सूचनाही करण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. काम सुरू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीमध्ये पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपुरात युवासेनेने फाडले एकनाथ शिंदेंचे बॅनर

पुरातत्त्व विभागालाच निधी का नाही?
मंदिरांचे जतन-संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाचे असून, त्या विभागाला निधी पुरवून हे काम करता आले असते. यातील तज्ज्ञ मंडळी त्यांच्याकडे आहेत, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. पुरातन मंदिरांच्या संवर्धनाचे काम यातील तज्ज्ञ कारागिरांकडून भरपूर वेळ देऊन अतिशय बारकाईने करावे लागते तसे तज्ज्ञ कारागीर रस्ते विकास महामंडळाच्या कंत्राटदारांना मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. आधीच रस्त्यांच्या कामात व्यस्त असलेल्या रस्ते विकास महामंडळावर एवढी मेहेरनजर दाखविण्यामागील उद्देश काय असावा, असा प्रश्नही विचारला जात आहे.

जतन, संवर्धन कामात या मंदिरांचा समावेश
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणारे एकवीरा देवीचे मंदिर, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर, सातारा जिल्ह्यातील उत्तरेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील धूतपापेश्वर, बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील भगवान पुरुषोत्तम मंदिर, औरंगाबादच्या सातारा येथील खंडोबाचे मंदिर, अमरावती जिल्ह्याच्या लासूर तालुक्यातील आनंदेश्वर, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा शिवमंदिर, नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर यांचा समावेश या कामांमध्ये करण्यात आला आहे.

रस्ते विकास महामंडळ हे काम करणार असले तरी काम गुणवत्तेनुसार होईल. शासनाने आम्हाला आदेशित केल्याने कामाचे प्रकल्प अहवाल तयार केले जात आहेत. एकूण आठ कामांपैकी पाच कामे पुरातत्त्व विभागाची आहेत. त्यांनीच काम करणे गरजेचे होते. आमच्या कामावर त्यांच्या सदस्यांची नजर असणार आहे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

हेही वाचा

बंडखोर आमदारांचे निलंबन कायदेशीरच; उदय वारुंजीकर विधिज्ञ

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त; कलम १४४ लागू

Back to top button