बारामतीत वरुणराजा बरसला | पुढारी

बारामतीत वरुणराजा बरसला

बारामती : पुढारी वृत्तसेवा: 1 जूननंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने बारामती शहरात बुधवारी (दि. 22) दुपारी दीडच्या सुमारास अर्धा तास हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने बारामतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, या पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून सुटका झाली. दि. 1 जून रोजी बारामती शहर आणि तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, तब्बल 20 दिवस बारामती शहर आणि तालुक्यात पावसाने दडी मारली होती. अजूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे उथळ भागात ठिकठिकाणी पाणी साठले होते. जून संपायला आठ दिवस बाकी असून, तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. मे महिन्यातही अवकाळीने बारामतीला हुलकावणी दिली होती. जास्तीचा पाऊस झाला तर वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

याशिवाय शेतीच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सध्या तालुक्यातील शेतकरी उसाच्या लागण हंगामात व्यस्त आहेत. सरी काढणे, तोडणे, बेणे आदींची तयारी सुरू आहे. 15 जूनपासून प्रत्यक्षात लागण हंगाम सुरू झाला असून, 30 जूनपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे. बुधवारी झालेल्या पावसाने उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजरी, सोयाबीन यांच्यासह तरकारी पिके घेण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पोटात गोळा; बदल्यांसाठी दिलेला मलिदा पाण्यात जाण्याची धास्ती

सांगली : पैशांचा पाऊस प्रकरणी दोघांना अटक

मंत्री रातोरात सुरतला गेले; गृह खात्याला कळले कसे नाही? : शरद पवारांचा सवाल

Back to top button